मनोविकाराच्या संदर्भात समुपदेशनाची आवश्यकता कुठे असते याबद्दल चर्चा करण्याआधी समुपदेशन या प्रक्रियेची व्याप्ती लक्षात घेतली पाहिजे. करियर काउंसिलिंग करण्यासाठी जे जातात त्यांना कसलाही आजार नसतो. ते आपल्याला कुठला व्यवसाय योग्य आहे आणि त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील याबाबत सल्ला घेण्यासाठी जात असतात. त्यामुळे समुपदेशन हे आजाराच्या पलिकडेही वापरले जाते. मात्र या लेखमालेत ज्या मानसोपचारांची माहिती आपण घेणार आहोत ती माहिती मनोविकार आणि त्या संदर्भातील समस्या याबाबतच असणार आहे. समुपदेशन हे थेट ज्याला आजार आहे त्याला उपयुक्त ठरु शकतेच पण त्याची काळजी घेणाऱ्यालाही त्याचा उपयोग होऊ शकतो ही अतिशय महत्वाची बाब आजही दुर्लक्षिली जाते हे मला आवर्जून नमुद करावंसं वाटतं. जगाचं लक्ष जो माणुस आजारी असतो त्यावरच असतं आणि जो त्याची मनोभावे काळजी घेत असतो त्याला जणू गृहित धरलं जात असतं.
जी माणसे आजाऱ्याला पाहायला येत जात असतात त्यांच्या दृष्टीने काळजीवाहक अदृश्य असतो. सर्व फोकस आजारी माणसावर. त्यातही आजारी माणुस भानावर असेल आणि संवेदनशील असेल तर त्याच्या तोंडून काळजीवाहकाबद्दल काही कौतूकाचे शब्द निघतात. मात्र तो आजारामुळे चिडचिडा झाला असेल किंवा मूळातच त्याला तशा संवेदना नसतील तर त्याची जी सेवा चाललेली असते त्या सेवेलाही तो देखील गृहीत धरतो आणि ते काळजीवाहकाला निराश करणारं असतं. अशा परिस्थितीत अनेकजण जे आधी ठणठणीत असतात ते काळजीवाहकाची भूमिका पार पडताना आजारी पडताना दिसून येतात. काहींना शारिरीक तर काहींना शारिरीक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे विकार जडलेले आढळतात. त्यामुळे ज्याची काळजी घ्यायची ते काम पार पडण्यातही अडथळे येऊ लागतात आणि एक प्रकारच्या विषारी वर्तुळात ही माणसे अडकतात. धड आजारी माणसाची काळजी घेता येत नाही आणि स्वतःची देखील तब्येत बिघडू लागते असे होण्यास सुरुवात होते. आणि पुढे या दोन्ही गोष्टी एकाचवेळी घडू लागतात.
असे असताना समुपदेशनाचा उपयोग काळजीवाहकालादेखील होऊ शकतो. हे करत असताना आपले डोके आणि मन हे उपचारांसाठी उघडे ठेवले पाहिजे ही समुपदेशनाचे पहिली अट आहे. याने काय होणार? नुसतं बोलून काय होतं? अशासारख्या कल्पना मनात घट्ट रुजलेल्या असतील तर समुपदेशनाने फायदा होणे अवघड असते. शिवाय समुपदेशन म्हणजे फक्त बोलणे असते हा तर एक फार मोठा गैरसमज आहे. बोलणे हा समुपदेशनाचा एक महत्वाचा भाग आहे. त्यानंतर “करण्याचा” भाग येतो. तो न केल्यास समुपदेशनाचा काहीही उपयोग होत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या समुपदेशनात तुम्हाला माईंडफुलनेसचं तंत्र शिकवलं गेलं तर तुम्हाला हे रोज घरी करावं लागतं. त्याबाबत कंटाळा केल्यास पुढे प्रगती होत नाही. तेच इतर सर्व गृहपाठाबद्दलही सांगता येईल. समुपदेशक तुम्हाला तुमच्या भावनांची नोंद करायला सांगेल. कुठल्यावेळी काय करता येईल याचे पर्याय देईल. ते आपल्याला करून पाहावं लागतं.
आपल्याला शंका असल्यास अर्थातच त्याचे निरसन करुन घ्यायला हवे. पण करण्याच्या गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो हेदेखील तितकेच खरे आहे. मात्र काहींना प्रत्यक्ष काहीही न करता नुसताच बौद्धिक वाद घालण्याची सवय असते जी येथे मारक ठरु शकते. समुपदेशक तुम्हाला उपाय सांगत नाही हे देखील येथे लक्षात घ्यायला हवे. तो तुमच्या मनातील गुंता सोडवून तुम्हाला स्वतःलाच उपाय शोधण्यासाठी तयार करत असतो. समुपदेशक तुम्हाला उपाय सांगू शकत नाही याचे कारण प्रत्येक माणसाची जगण्यासंबंधीची मूल्ये वेगळी असतात. मला जे महत्वाचे वाटेल ते तुम्हाला वाटेलच असे नाही. समुपदेशकाने आपली जीवनमूल्ये आपल्या समोर बसलेल्या माणसावर लादू नयेत हा समुपदेशनाचा महत्वाचा नियम आहे. आणि तसे केल्यास समुपदेशन यशस्वी होण्याची शक्यता मावळते. ज्याला उपचार घ्यायचा आहे त्याने कुठलाही आडपडदा न ठेवता आपली समस्या समुपदेशकासमोर मांडायला हवी ही अपेक्षा जितकी रास्त आहे तितकीच समुपदेशकानेदेखील तसे विश्वासासाचे वातावरण निर्माण करायला हवे हे देखील खरे आहे.
या दोन्ही गोष्टी घडण्यास वेळ लागतो. पण त्या घडल्यास समुपदेशनाचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वाढते असे म्हणता येईल.
अतुल ठाकुर
Counseling Psychologist
(मनापासून या सदरासाठी लिहिले जाणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत. प्रत्यक्ष आयुष्यात आपल्याला मनासंबंधी काही समस्या किंवा आजार असल्यास मानसोपचारतज्ञाचे अथवा समुपदेशकाचे मार्गदर्शन घ्यावे.)