मानसशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून मानसोपचारांबद्दल कुतुहल होतंच. पुढे व्यसनमुक्तीक्षेत्रात काम करु लागल्यावर आणि मानसशास्त्रात शिक्षण झाल्यावर हे कुतुहल आणखी वाढीला लागलं. यशावकाश सीबीटी म्हणजे Cognitive behavioural Therapy चे शिक्षण घेतले. आणि मानसोपचारांचे दार किलकिले झाले. मानवी स्वभावाचा चिवटपणा आणि तो बदलणे किती कठीण आहे याचा अंदाज व्यसनमुक्तीक्षेत्रात काम करताना आलाच होता. मात्र त्या दुर्घट स्वभावावर मात करुन मानसोपचार तज्ञ आणि समुपदेशक मनोविकाराला आळा घातलात हे पाहिले आणि या एकंदर उपचारांचे महत्व लक्षात आले. “मनापासून” या लेखमालेत मानसोपचारांची माहिती देण्याचा मानस आहे. आपल्याकडे मनाच्या आजारांवर इलाज करताना प्रामुख्याने औषधे आणि समुपदेशन अशा दोन उपाययोजना केल्या जातात. त्यापैकी औषधे हे मानसोपचारतज्ञ (सायकियाट्रीस्ट) देतात. जो मी नाही. समुपदेशन हे सायकॉलॉजीस्ट करतात जो मी आहे. त्यामुळे या लेखमालेत औषधांबद्दल चर्चा नसेल. हे आधीच सांगण्याचे कारण बहुसंख्य लोकांना कोणत्या आजारावर औषधं कोणती आहेत हे जाणून घेण्यामध्येच रस असतो. कारण समुपदेशन हा दीर्घकाळ चालणारा, धीर आणि चिकाटी यांची मागणी करणारा उपाय आहे. इतका धीर सर्वजण दाखवू शकत नाहीत.
मानसोपचार घ्यायचे म्हणजे आपण वेडे आहोत का असा गैरसमज असण्याचे दिवस मागे पडले असले तरी या क्षेत्राबद्दल अजूनही अनेक समजूती अशा आहेत ज्यामुळे उपचारांमध्ये अडचणी येतात आणि माणसे दुःख सहन करत राहतात. अनेकांना मनोविकार म्हणजे सर्दी तापासारखाच आजार वाटतो. गोळ्या घेतल्या की काम झालं. औषधे ही तुम्हाला भानावर आणतात. त्यानंतर समुपदेशनाचे काम सुरु होते. वर्षानुवर्षे अनुभवास येणाऱ्या परीस्थितीमुळे, एखाद्या एखाद्या विशिष्ट वर्तनामुळे, किंवा अंगभूत स्वभावदोषांमुळे एखादा मनोविकार निर्माण होतो. बरेचदा माणसे तऱ्हेवाईक वागू लागतात. पण त्यावर “त्याचा किंवा तिचा स्वभावच तसा आहे” असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आणि माणसे उपचारांशिवायच स्वतःला आणि काहीवेळा दुसऱ्यांनाही त्रास देत दिवस काढत असतात. जोवर भांडे फारसे डचमळत नसते तोवर दिवस जात असतात. कुणालाही मुद्दाम उपचार घ्यावेत अशी आवश्यकता वाटत नाही. मग कधीतरी अशी परिस्थिती उद्भवते जेव्हा माणसाच्या रोजच्या जगण्यातच समस्या निर्माण होऊ लागतात. तेव्हा दुर्लक्ष करता येत नाही.
अशावेळी जेव्हा मानसोपचार घेण्याचा विचार सुरु होतो तेव्हाही काही गोष्टी माहित असाव्या लागतात असे मला वाटते. ज्याबद्दल समाजात बऱ्यापैकी आजही माहिती नाही. समुपदेशक आणि उपचार घेणारा यात विश्वासाचं नातं निर्माण झालं तर उपचार हे परिणामकारक होऊ शकतात. अन्यथा योग्य परिणाम दिसून येत नाहीत. ही लेखमाला मानसोपचारांची माहिती देणार असली तरी एक उपचर घेणाऱ्याची काय भूमिका असायला हवी यावरही आपण चर्चा करणार आहोत. काहीवेळा घरातील व्यक्तीला गंभीर आजाराने ग्रासलेले असते आणि त्या व्यक्तीची काळजी घेणारे घरचे सदस्य चिंतेने आजारी होतात किंवा त्यांना नैराश्य घेरते. अशा काळजीवाहकांसाठीदेखील समुपदेशनाचा उपयोग होऊ शकतो. मनापासून या सदरासाठी लिहिले जाणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत. प्रत्यक्ष आयुष्यात आपल्याला मनासंबंधी काही समस्या किंवा आजार असल्यास मानसोपचारतज्ञाचे अथवा समुपदेशकाचे मार्गदर्शन घ्यावे लागेल हे आधीच येथे नमूद करणे मला आवश्यक वाटते. अनुभवातून माझ्या हे लक्षात आले आहे की अनेकदा माणसे प्रत्यक्ष उपाय टाळून याबाबत काहीतरी तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करीत असतात. जे फारसे उपयोगाचे ठरत नाही. व्यसनमुक्तीच्या बाबतीत तर बहुतेकदा असेच होते.
मनोविकार अनेक आहेत. त्याच्या छटा अनेक आहेत. त्यावर उपायही अनेक असतात. काहीवेळा निरनिराळ्या उपचारपद्धतींचा एकत्रही वापर केला जातो. समुपदेशनातही अनेक उपचारपद्धती उपलब्ध आहेत. या सर्वच गोष्टींचा मला अनुभव नाही त्यामुळे अनेक पुस्तकांचा आणि लेखांचा या लेखमालेसाठी मी संदर्भ घेणार आहे. मात्र या लेखमालेत काय नसेल याबद्दल येथे स्पष्ट लिहिणे मला गरजेचे वाटते. अलिकडे भारतीय तत्वज्ञान आणि अध्यात्मिक परंपरेतील काही ग्रंथ आणि अलिकडील मानसोपचार पद्धती यांची तूलना अनेकांकडुन केली जाते. अशी तूलना या लेखमालेत केली जाणार नाही. “भारतीय तत्वज्ञान महान का तर ते आजच्या मानसोपचारांशी मिळते जूळते आहे” अशी माझी भूमिका नाही आणि ते मला पटतही नाही. भारतीय तत्वज्ञानात स्वतंत्रपणे ठळक अशा उठून दिसणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. संस्कृतचा विद्यार्थी म्हणून त्याबद्दल मला कट्टर अभिमान आहे. भगवद्गीता, आणि विशेषतः पातंजल योगसूत्र याबद्दल मला या लेखमालेत स्वतंत्रपणे लिहायचे आहे. भारतीयांनी फार प्राचीन काळापासून मनाचा विचार केला आहे. त्याचा उहापोह मी करेनच. पण त्यासाठी आधुनिक मानसोपचार हा निकष किंवा ही फुटपट्टी वापरण्याची मला गरज वाटत नाही.
आणखी एक गोष्ट म्हणजे मी मूळात सोशियॉलॉजिस्ट आहे आणि मग सायकॉलॉजिस्ट आहे. मला “माणसाचे दुःख हे त्याचा परीस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोण कसा आहे त्यावर अवलंबून असते” हे कधीही पटलेले नाही. परीस्थितीमध्ये विषमता असते. काही माणसे वाईट असतात, वाईट वागतात. समाजात माणसे, संस्था, गट हे एकमेकांचे शोषण करत असतात. यातही आपल्या दुःखाचे कारण दडलेले असू शकते यावर माझा विश्वास आहे. या गोष्टी बदलणे कठीण असले तरी बदलता येतात आणि बदलाव्या लागतात यावरही माझा विश्वास आहे. अनेक समाजसुधारकांनी त्यासाठी आपली आयुष्य पणाला लावलेली उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्यामुळे “तुम्ही पाऊस थांबवू शकत नाही मात्र छत्री घेऊ शकता” “संपूर्ण जगातले काटे काढू शकत नाही पण चप्पल घालू शकता” अशासारखे सल्ले या लेखमालेत नसतील. तुम्हाला संपूर्ण जग बदलण्याची, सर्वंकष क्रांती करण्याची मूळात गरज नसते. तसा आवाकाही सर्वांमध्ये नसतो. मात्र आपल्या आवाक्यात असलेल्या गोष्टी प्रयत्न करून बदलता येतात. स्वभाव बदलणे कठीण असले तरी तो देखील बदलता येतो हे मी व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात अनुभवले आहे. त्यामुळे या लेखमालेत चर्चा होईल ती समाजाधिष्ठीतच असेल. व्यक्तीकेंद्रित नसेल हे नक्की.
अतुल ठाकुर
Counseling Psychologist
(मनापासून या सदरासाठी लिहिले जाणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत. प्रत्यक्ष आयुष्यात आपल्याला मनासंबंधी काही समस्या किंवा आजार असल्यास मानसोपचारतज्ञाचे अथवा समुपदेशकाचे मार्गदर्शन घ्यावे.)