नमस्कार,
दर्दैवाने आपल्याकडे व्यसनाला कळत नकळत खतपाणी घालणारी प्रवृत्ती आढळते. उदाहरणार्थ ग्रूपमध्ये व्यसन करताना “याचा स्टॅमिना जबरदस्त आहे” असे कौतूकाने बोलणारी माणसे असतात. या जबरदस्त स्टॅमिनाचे केलेले कौतूक त्या माणसाला कदाचित व्यसनाकडे नेऊन त्याच्या आयुष्याचा खेळखंडोबा करु शकते हे लोकांच्या ध्यानातच येत नाही.
अनेकदा असं घडतं की ग्रुपमध्ये पहिल्यांदा दारु प्यायली जाते आणि त्यातले एकदोघे असे असतात की ज्यांना आपण केलेल्या कृत्याबद्दल अपराधी वाटतं. त्यांना घरच्यांशी खोटे बोलण्याची लाज वाटते. आणि मग ते लोक दारुला कधीही शिवत नाहीत. एक दोघे असे निघतात की ज्यांना वाटतं हे कधी तरी ठिक आहे पण आपल्याला नेहेमी चालणार नाही. एखाद दुसरा मात्र असा असतो की आपण प्यायलो आणि घरच्यांना कळलेदेखिल नाही यातच त्याला मोठेपणा वाटतो. त्याबद्दल तो मित्रांमध्ये फुशारकीही मारतो.
हा माणुस पुढे व्यसनी होण्याची शक्यता जास्त असते. कारण त्याला आपण दारु प्यायलो तरी लोकांना कळत नाही, आपण लोकांना फसवू शकतो यातच मोठेपणा वाटु लागतो. या पोकळ मोठेपणाला खतपाणी देणारे आजुबाजुला असतातच. अशा माणसांचे काय होते याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा. आणि मंडळी, आनंदयात्रीसाठी लिहा आणि व्यसनमुक्तीयात्रेत सहभागी व्हा!
अतुल ठाकुर