नमस्कार,
आपण स्वभावदोषांवर बोलत आहोत. आणि त्याबद्दल काही संकेत मिळतात असंही मी काल म्हटलं होतं. जी माणसे बढाया मारत असतात, फुशारक्या मारत असतात ती व्यसनाकडे वळण्याची शक्यता जास्त असते असे एक निरिक्षण आहे. व्यसनात बुडालेली माणसे तर अनेकदा बढाया मारताना दिसतात. समाजात एखाद्याबद्दल असे बोलले जाते की हा माणूस लाथ मारीन तेथे पाणी काढीन अशा वृत्तीचा आहे. किंवा डॅशिंग आहे, डेरींगबाज आहे. व्यसनी माणसांमध्ये अशी वृत्ती अनेकदा आढळते.
कारण पुढे हा तथाकथित डॅशिगबाज डेरींगबाज स्वभाव फक्त खोटे बोलणे, बायकांवर हात उचलणे, व्यसनात लपवाछपवी करणे, समारंभात जाऊन शीतपेयांच्या बाटलीत दारु नेऊन पिणे असेच पराक्रम करण्यात वाया जाणार असतो. मला एका ज्येष्ठ माणसाने सुरेख उदाहरण दिले होते. ते म्हणाले समजा रस्त्यावर खुप ट्रॅफिक आहे तर समजुतदार माणसे नेमस्त विचार करुन गाडी हळू चालवतील. पण ही तथाकथित डॅशिंग माणसे काना कोपर्यातून गाडी काढतील, वेग वाढवतील आणि इष्ट स्थळी पोहोचल्यावर बढाया मारतील.
हा स्वभाव व्यसनाकडे कसा नेतो याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर