फक्त आजचा दिवस – ७ – स्वभावदोषाबद्दल

नमस्कार

व्यसन आणि स्वभावदोष या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील आणि तरीही समाजात याबद्दलचे अज्ञान अगाध आहे. मुक्तांगणमध्ये व्यसनावर काम केले जाते हा सत्याचा एक भाग आहे. तेथे व्यसनाकडे तुम्हाला नेणार्‍या स्वभावदोषावर काम केले जाते हा सत्याचा दुसरा भाग आहे. जो स्वभाव तुम्हाला वारंवार व्यसनाकडे खेचून नेतो तोच बदलला की व्यसनमुक्ती सोपी होते हे तत्त्व त्यामागे आहे. मात्र याबाबत विज्ञानाकडेही ठाम अशी माहिती नाही. नक्की कुठल्या स्वभावाची माणसे व्यसनी होतात याबाबत ठामपणे सांगता येत नाही. काही संकेत जरूर मिळतात.

याबद्दल बोलण्याआधी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे एखादी जादुची कांडी फिरवल्याप्रमाणे स्वभावदोष दूर होत नाही. त्यावर दीर्घकाळ चिवटपणे काम करावे लागते. निरनिराळे उपाय योजावे लागतात. आणि त्यासाठी मूळात तुमच्यात हा दोष आहे हे तुम्हाला प्रामाणिकपणे स्विकारावं लागतं आणि तसा स्विकार केल्यावर आपल्याला आपला दोषपूर्ण स्वभाव बदलायचा आहे यासाठी मनात प्रामाणिक तळमळ असावी लागते.

मी वर दोन वेळा “प्रामाणिक’ हा शब्द वापरला आहे त्याला कारण आहे. माणसे बोलताना अनेक गोष्टी बोलतात, मान्य करतात पण करायची वेळ आली की एकतर ढेपाळतात किंवा अगदी विरुद्ध कृती करतात. म्हणूनच व्यसनमुक्ती हवी असेल तर मनापासून स्विकार आणि कृतीला महत्त्व आहे.

कुठल्या स्वभावाच्या व्यक्ती व्यसनाकडे वळण्याची शक्यता जास्त असते याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...