व्यसनी माणसाला मर्यादेत राहता येत नाही ही गोष्ट अनेकदा सिद्ध होऊनही माणसाला व्यसनाचे इतके अतीव प्रेम असते की त्याला पुन्हा पुहा आशा वाटत राहते की यावेळी आपण अगदी मर्यादेतच राहायचं. फक्त एक बियर प्यायची, फक्त एक पेग घ्यायचा. अशा अनेक भ्रामक कल्पनांचे पिंजरे व्यसनी व्यक्ती आपल्या अंगावर बाळगत असते. आणि पुन्हा पुन्हा व्यसनाच्या जाळ्यात अडकत असते. याचे एकमेव कारण म्हणजे आपण आता आयुष्यात कधीही व्यसन करु शकणार नाही या सत्याकडे त्याने पाठ फिरवलेली असते.
काही दिवस, काही महिने, काही वर्ष व्यसनाला हात न लावता काढली की त्याच्या “आपण मर्यादेत राहुया” या समजाला आणखी खतपाणी मिळते. काहीवेळा मंडळी फक्त व्यसनामुळे खराब झालेली तब्येत सुधारण्याचीच वाट पाहाताना दिसतात. एकदा तब्येत नीट झाली की पुन्हा व्यसनाकडे वळतात. व्यसनाकडे पुन्हा पुन्हा वळाणारी माणसे शेयरींग करताना नेहेमी असे सांगताना दिसतात की आम्हाला अतिआत्मविश्वास वाटत होता, किंवा आम्हाला सारे काही कळते असे वाटत होते. या अतिआत्मविश्वासामागे सत्याशी केलेली प्रतारणा आहे अशी माझी समजूत आहे. एकदा जर तुम्ही मनात पक्कं धरून चाललात की आपल्याला पुन्हा कधीही व्यसन करता येणार नाही तर पुन्हा प्रयोग करण्याचा विचार मनात येणार कसा?
तरीही माणसे प्रयोग करीत राहतात. जोपर्यंत संपूर्ण सरेंडर होत नाहीत, व्यसनात अडकत राहतात. याबद्दलही आपण चर्चा करुया. तोपर्यंत मंडळी फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
आपला
अतुल ठाकुर