फक्त आजचा दिवस – ७१ – व्यसनाचा स्वीकार

नमस्कार,

मुक्तांगणमध्ये दाखल झाल्यावर माणसाला निरनिराळी व्यसनं केलेली, व्यसनात टोकाला गेलेली माणसे दिसु लागतात. त्यांच्या दारुण, विदारक कथा ऐकायला मिळतात. दाखल झाल्यावर व्यसनाचा पदार्थ मिळत नाही. त्यामुळे अनेकांना विथड्रॉलचे त्रास होऊ लागतात. क्रेव्हींग येऊ लागतं. याचा अनुभव स्वतः व्यसनी माणसाला येतोच शिवाय इतरांची अवस्थाही पाहायला मिळते. थोडक्यात आजवर व्यसनामुळे काय होऊ शकतं हे प्रेमाच्या माणसांनी सांगितलेलं असतं. ते व्यसनी माणसाने अहंकाराने धुडकावून लावलेलं असतं. ते सारं आता प्रत्यक्षात समोर दिसत असतं.

आपण जर आताच थांबलो नाही तर आपलीही अवस्था अशीच किंवा याहून वाईट होऊ शकेल याचा अंदाज व्यसनी माणसाला येतो. आपल्याला मदतीची गरज आहे, आपण स्वतःहून थांबू शकत नाही हे देखिल त्याच्या लक्षात येतं. आणि हळुहळु तो मुक्तांगणच्या उपचारांमध्ये मनापासून सहभाग घेऊ लागतो. असं म्हणतात जे तुम्हाला बदलायचं असतं त्याचा तुम्हाला प्रथम स्वीकार करावा लागतो. स्वीकारच केला नाही तर तुम्ही एखादी गोष्ट कशी बदलणार? तेव्हा याटप्प्यावर अनेक माणसे आपण व्यसनी आहोत, आपल्याला व्यसनाचा आजार आहे याचा स्वीकार करताना दिसतात. हे माझ्या समजूतीप्रमाणे सत्याकडे पडलेले पहिले पाऊल असते.

मात्र सर्वच जण सुरुवातीला हे स्वीकारत नाहीत. व्यसनाचे स्वरुप आणि व्यसनी माणसाचा “ईगो” हे दोन्ही चिवट असतात. अशी माणसे सुरुवातीला असहकार पुकारण्याची शक्यता असते. काहीजण आम्हाला या उपचारांची गरज नाही अशीही भूमिका घेतात. त्यांना उपचारांच्या आधीच बाहेर जाण्याची घाई लागलेली असते. ही माणसे बाहेर पडून पुन्हा व्यसनाच्या मार्गाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपला

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...