नमस्कार,
मुक्तांगणला व्यसनी माणुस उपचारांसाठी दाखल झाला म्हणजे त्याची इच्छा असो वा नसो सत्य त्याच्या अंगावर कोसळते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याचे कारण मुक्तांगणमध्ये गांधींच्या आश्रम जीवनपद्धतीचा स्वीकार केला गेला आहे. तेथे तुम्हाला जास्त पैसे देऊन स्पेशल रुम्स घेता येत नाहीत कारण मुळात तशी सोयच ठेवलेली नाही. निरनिराळी आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक पार्श्वभूमी असलेली माणसे एकाच ठिकाणी आलेली असतात आणि व्यसनासाठी उपचार घ्यायला आलेले मुक्तांगणमित्र इतकीच या सर्वांची ओळख असते.
येथे आल्यावर व्यसनी माणसाला सर्वप्रथम व्यसनाचे भीषण परिणाम दिसु लागतात. त्याच्याइतके किंवा त्याच्याहून खुप पुढे गेलेले व्यसनी त्याच्या समोर वावरत असतात. एकदोन दिवसात ओळखी होऊ लागतात आणि एकेकाने व्यसनामुळे स्वतःचे किती नुकसान करून घेतले आहे हे ठळकपणे समोर येऊ लागते. प्रत्यक्ष दिसणारी ही वस्तुस्थिती आता नाकारता येणे शक्य नसते. तरीही काहीजण त्याही परिस्थितीत स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करीत असतील की आपल्याला कुठे इतकं काही झालंय. शेवटी काहींची अजूनही स्वतःला फसवण्याची प्रवृत्ती शिल्लक राहात असेल. पण इतके टोकाला गेलेले व्यसनी घाऊक प्रमाणात एकाचवेळी एकाच हॉलमध्ये मुक्तांगणसारख्या ठिकाणीच पाहायला मिळतात. त्याचा काहीतरी परिणाम होतोच.
या अंगावर कोसळलेल्या सत्यामुळे माणसे हळुहळु स्वीकाराच्या दिशेने वाटचाल करु लागतात. हे सत्य स्वीकारण्याकडे पडलेले पहिले पाऊल असते.
अतुल ठाकुर