नमस्कार,
आपल्याकडे धाडसाच्या अनेक व्याख्या आहेत. सीमारेषेवर शत्रूला तोंड देणारे सैनिक धाडसीच असतात. अनेक शेयरींगमध्ये ऐकलंय की व्यसन केल्यावर धाडस येते. व्यसनातले धाडस हे पराक्रमाकडे नेणारे नसून तोंडाला काळे फासणारे असते हे येथे लक्षात घेतलेले बरे. याचा अर्थ हा की एरवी शुद्धीवर असताना लोकलाजेस्तव जे कृत्य करायला माणुस धजणार नाही ते कृत्य व्यसन केल्यावर माणुस बिनदिक्कतपणे करतो. व्यसनात लोकलाजेची भावना उरलेली नसते.
वेश्येकडे जाणारी माणसे आधी पोटात दारु ढकलतात असं ऐकलं आहे. दारु नसताना तेथे जाणं कठीण वाटतं पण एकदा दारु पोटात गेली की माणसाला चांगल्या वाईटाची तमा नसते. एरवी खोटे बोलणे माणसाला सहज वाटत नसेल पण व्यसनासाठी, पैसे मिळविण्यासाठी, व्यसन लपविण्यासाठी माणसे आपल्या प्रेमाच्या माणसांशीही बिनदिक्कत खोटे बोलतात.
माझ्यासमोर उच्चशिक्षित माणसाचे उदाहरण आहे. एरवी सभ्य भाषा वापरणारा हा मनुष्य व्यसनाच्या दरम्यान अतिशय गलिच्छ शिव्या देत असे. व्यसन सुटल्यावर पुन्हा त्या माणसाची भाषा सभ्य झाली. थोडक्यात काय तर व्यसन केल्यावर सारासारविचार करण्याची शक्ती माणसात राहात नाही. आणि त्यातच तो माणुसकीला काळीमा फासणारी कृत्ये करून बसतो. यालाच व्यसनातले डेयरींग म्हणतात.
व्यसन तुमच्याकडून आणखी काय काय करवून घेतं याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर