व्यसनाचे पाणी डोक्यावरून जाऊ लागले की सत्य आणि असत्य यांचा झगडा सुरु होताना दिसतो. घरच्यांना दिसत असते की आता काहीतरी उपाय करणे आवश्यक आहे. ते सत्य परिस्थिती पाहात असतात तर व्यसनी माणुस डिनायलमध्ये असतो. तो अजूनही सत्य पाहाण्याच्या अवस्थेत नसतो. या टप्प्यावर सुरुवातीला तरी ज्याचा जोर जास्त ते जिंकतात. पण व्यसनाने भीषण अवस्था गाठल्यावर शेवटी कधितरी सत्य परिस्थिती ही मान्य करावीच लागते. आणि माणसे व्यसनमुक्तीकेंद्राची वाट चालु लागतात.
व्यसनाचे असत्याशी असलेले घट्ट नाते इथे कळून येते. अगदी व्यसनमुक्तीकेंद्रात दाखल होईपर्यंत काहीजण आपल्याला व्यसन नाहीच असं म्हणत असतात. आपल्याला येथे फसवून उगाच आणले आहे अशी त्यांची धारणा असते. काही महाभाग या असत्य समजूतीमुळे बराच काळ घरच्यांवर डूख धरून राहतात.
पण व्यसनमुक्तीकेंद्रात दाखल झाल्यावर तुमच्या मनात असो वा नसो तुम्हाला सत्य हे समोर दिसु लागतंच विशेषतः मुक्तांगणसारख्या केंद्रात जेथे गांधींच्या आश्रम जीवनपद्धतीचा अंगिकार केला गेला आहे तेथे सत्याचे फार जवळून दर्शन घडते. कारण सर्व स्तरावरील व्यसनी माणसे एकाच ठिकाणी राहात असतात. व्यसनामुळे आयुष्याची धुळदाण उडालेली अनेक माणसे येथे एकत्र दिसतात. व्यसनमुक्तीकेंद्रात जबरदस्तीने आणल्यामुळे घरच्यांवर नाराज असलेली बहुतेक माणसे अशावेळी भानावर येतात असे एक निरिक्षण आहे.
अतुल ठाकुर