नमस्कार,
व्यसन सुरु झाले की अर्थातच पैसा लागतो. व्यसनी माणसे व्यसनासाठी जो पैसा उभा करतात त्यात काही पॅटर्नस दिसून येतात. उदाहरण द्यायचं झालं तर बहुसंख्य व्यसनी घरात गंभीर आजार असल्याची बतावणी करताना दिसतात. आणि बहुतेक सहृदयी माणसे या क्लुप्तिला बळी पडतात.
दुसरा प्रकार जर नोकरी अजूनही सुरु असेल तर पगार घरी देण्याआगोदरच बाहेरच्या बाहेर व्यसनात उडवणे. येथेही कामावर गंभीर आजार असल्याचं सांगून सहकार्यांकडून पैसे काढले जातातच. यात अनेकदा संपूर्ण पगारच व्यसनातच उडून जाण्याची शक्यता असते. शिवाय कर्जही होऊ शकते.
तिसरा प्रकार चोरी. ती अनेकदा घरातच केली जाताना दिसते. घरातल्या वस्तु विकणे, दागिने विकणे सुरु होते. घरच्यांना कळू नये अशी खबरदारी घेतली जाते. अर्थातच ते शेवटी कळतेच.
काहीवेळा कारण आजाराचेच असते असे नाही. तातडीची निकड आहे आणि लगेच पैसे परत करतो असा वायदा दिला जातो आणि फसवले जाते. व्यसनी माणसावर व्यसन स्वार असते हे असे.
असत्य सुरुवातीला पचलं की त्याची सवय लागते आणि पुढे त्याबद्दल आपण इतरांना सहज गुंडाळु शकतो असा आत्मविश्वासही वाटु लागतो. यामुळे व्यसन सुरु राहतं आणि त्याचा विळखा घट्ट होत जातो.
अतुल ठाकुर