नमस्कार,
आपल्या प्रेमाच्या माणसांना फसवण्याची बुद्धी होणे हा व्यसनातला सर्वात दु:खद भाग. यामुळे व्यसनी माणसे आपला विश्वास गमावून बसतात आणि पुढे व्यसनमुक्ती अवघड करून ठेवतात. घरात व्यसनाला परवानगी दिल्यावर पत्नी उलट पतीसाठी पिताना बरोबर काहीतरी खायला हवे म्हणून खाणे तयार करते. तिला काय कल्पना की कळत नकळत आपण पतीचे व्यसन बळकट करीत आहोत.
व्यसन हा धोकादायक आणि फसवा आजार आहे म्हणतात याचे कारण हे आहे. तुम्हाला त्याची योग्य माहिती नसेल तर तुम्हाला ज्या गोष्टी उपायकारक वाटतात त्या प्रत्यक्षात अपायकारक ठरु शकतात.
घरात व्यसन असले की संपूर्ण कुटूंबच त्यात अडकते. कुणाचीही सुटका नसते. सर्वजण आपापल्या परीने व्यसनी माणसाची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात. त्यात पत्नी, जिला आपण सहचरी म्हणतो तिची अक्षरशः सत्त्वपरीक्षाच असते. कारण एका बाजूने पती तिला फसवत असतो तर दुसर्या बाजूला समाजाचे दडपण येऊ लागते. तिसर्या बाजूने कुटूंबाकडूनही दडपण येण्याची शक्यता असते. मुलांना सांभाळायचे असते. अशावेळी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु होतात आणि असत्याचरणाचे वेगळे दर्शन कसे घडते यावर आपण चर्चा करुया. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर