फक्त आजचा दिवस – ६३ – व्यसनाची सुरुवात असत्याने

नमस्कार,

अनेकदा पहिला घोट हा उत्सुकतेपोटी घेतला जातो. मात्र हा पहिला घोट घेणारे सर्वच व्यसनी होत नाहीत. काहींना हे आपलं काम नव्हे असंही वाटतं आणि ते पुन्हा त्याकडे वळत नाहीत. त्यांच्यासाठी आणि त्यांच्यापुरता हा प्रश्न संपलेला असतो. मात्र ज्याला व्यसन लागणार असते त्याच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरु होतं. हे विचार आपल्याला दारु तर प्यायची आहे पण समाजाला दिसताही कामा नये तेव्हा काय करावे अशा स्वरुपाचे असतात.

थोडक्यात काय तर समाजाला फसवायचे कसे या विचारातून आणि अशा तर्‍हेच्या असत्याचरणातून बहुतेकांच्या पिण्याचा प्रवास सुरु होतो. अद्याप भानावर नसण्याची पायरी आलेली नसते. व्यसनामुळे भान हरपल्यावर कुणाला फसवण्याची गरज नसते कारण तेवढी शूद्धच राहिलेली नसते.

पहिला घोट घेणार्‍यांपैकी ज्यांना तो तथाकथित आनंद पुन्हा पुन्हा हवा असतो ती माणसे घरी जाताना तोंडाचा वास येणार नाही अशा गोळ्या खाऊन जातात. त्याबद्दल उत्साहाने मार्गदर्शन करणारी माणसेही त्यांना भेटतात. ही मंडळी घरी जाऊन सामान्यपणे वावरतात आणि इथेच त्यांना आपण जगाला फसवू शकतो असा आत्मविश्वास वाटू लागतो.

व्यसनमुक्तीच्या दरम्यान आणखी कशा तर्‍हेचं असत्याचरण घडतं याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...