फक्त आजचा दिवस – ६२ – फसविण्याची सवय

नमस्कार,

व्यसनी व्यक्ती चलाख असतात असं म्हटलं जातं. याचा मला एक अनुभव आला होता. मुक्तांगणला माझे संशोधन सुरु होते. त्यावेळी खाली काहीवेळ रिसेप्शनमध्ये मी बसत असे. तेथे बसल्याबसल्या खुप काही पाहायला, ऐकायला मिळत असे. त्यावेळी मुक्तांगणमध्ये लहान वयाचे रुग्ण दाखल होण्याच्या चिंताजनक घटना घडू लागल्या होत्या. असाच एक सोळा सतरा वर्षाचा मुलगा जूगाराच्या व्यसनामुळे दाखल झाला होता. त्याने मला गाठले. त्याला कुणालातरी फोन करण्यासाठी माझा मोबाईल हवा होता. मुक्तांगणमध्ये मोबाईल जवळ बाळगु दिला जात नाही.

मी त्याला वर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे दाखवले तर म्हणाला आपण बाथरुममध्ये जाऊया. तेथे मी फोन करतो. बाथरुममध्ये कॅमेरे नसतात. त्याला काहीतरी कारण सांगून मी मोबाईल दिला नाहीच. पण व्यसनामुळे फसवण्याची वृत्ती आणि असत्याचरण हाडीमांसी कसे खिळलेले असते याचे प्रात्यक्षिकच त्या दिवशी पाहायला मिळाले.

व्यसनमुक्तीच्या मार्गावर चालायचे असेल तर या स्वभावदोषांवर काम करावे लागते अन्यथा व्यसनमुक्ती अवघड होऊन बसते. व्यसनाच्या संदर्भात बारकाईने लक्ष दिलं तर असत्याचरण हे अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही घडलेले दिसून येते. दारु प्यायल्यावर घरच्यांना वास येऊ नये म्हणून कसल्या कसल्या गोळ्या खाणे हा फसवणूकीचा आणि असत्याचरणाचाच प्रकार आहे.

व्यसनमुक्तीच्या दरम्यान आणखी कशा तर्‍हेचं असत्याचरण घडतं याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे हे लक्षात ठेवा. आणि मंडळी, आनंदयात्री मासिकासाठी लिहा आणि व्यसनमुक्तीयात्रेत सहभागी व्हा!

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...