फक्त आजचा दिवस – ६० – अंबाड्यातून तंबाखु

नमस्कार,

कुठेही गेल्यावर तुमची कसून तपासणी झाली तर आजकाल सुरक्षेच्या दृष्टीने ते योग्यच समजले जाते. अगदी मॉलमध्येही चेकींग करतातच. पण व्यसनमुक्तीकेंद्रात, जेथे माणसे व्यसन सोडायला म्हणून पैसे भरून दाखल होतात तेथे कुणी व्यसनी पदार्थ नेऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून तपासावं लागतं यासारखी दुर्दैवाची दुसरी गोष्ट नसेल. असत्याचरणाचा हा एक वानगीदाखल नमुना आहे.

मुक्तांगणमध्ये बायकांनी आपल्या पतीसाठी अंबाड्यातून चोरून तंबाखु नेण्याच्या घटना घडल्या आणि कुटुंबाने भेटण्याच्या दिवशी स्त्रीकडून स्त्रीयांची तपासणी करणे सुरु झाले. याची खरं तर गरज नसायला हवी पण व्यसनीमाणसाच्या सुरक्षेचा प्रश्न हा महत्त्वाचा असतो. व्यसनमुक्तीकेंद्रात घरचेच चोरुन व्यसन पुरवायला लागले तर उपचारकेंद्रातून बाहेर पडल्यावर व्यसनी माणसाचे व्यसन सुटण्याची आशाच करायला नको.

आपल्याकडे जेथे शिस्त दाखवायला हवी तेथे दाखवली जात नाही आणि नको तेथे आपल्या मनाला पाझर फुटतो. त्यामुळे आता घरच्यांनी आपल्या माणसासाठी खाण्याचे पदार्थ आणले तरीही मुक्तांगणमध्ये त्यांची कडक तपासणी केली जाते. कारण फरसाणाच्या पुड्यांमधून तंबाखु देण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

व्यसनमुक्तीच्या दरम्यान आणखी कशा तर्‍हेचं असत्याचरण घडतं याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...