नमस्कार,
बहुतेक जण स्वतःच्याच पैशाने व्यसनाला सुरुवात करतात. अनेकदा असं ऐकलंय की काही व्यसनाचे पदार्थ हे सुरुवातीला अगदी स्वतात पुरवले जातात. त्यांची माणसाला सवय लागावी म्हणून. एकदा माणुस त्या विळख्यात अडकला की मग त्या व्यसनाची भरमसाठ किंमत वसूल केली जाते. व्यसन करण्याची जागा ठरलेली असेल तर ती व्यसनी व्यक्तीला जास्तीत जास्त आरामदायक वाटावी यासाठीही प्रयत्न केले जातात. जूगाराच्या जागी पिण्याचीही सोय करुन देण्याचे उदाहरण मला माहित आहे. थोडक्यात काय तर व्यसनाला आर्थिक गणित असतं आणि ते व्यसन पुरवणार्यांना जास्तीत जास्त फायदेशीर व्हावं यासाठी व्यसनी माणसाची चांगली बडदास्त राखली जाते.
अर्थात याला मर्यादा असतातच. व्यसनासाठी कर्ज देणारी माणसे तुम्ही ते कर्ज फेडू शकाल की नाही याचाही नीट अंदाज घेतच असतात. जोपर्यंत तुमची कर्ज फेडण्याची क्षमता आहे तो पर्यंत तुम्हाला कर्ज देणारी माणसे भेटतच जातात. व्यसनामुळे कर्जबाजारी होऊन तुम्ही आणि तुमचे कुटुंब देशोधडीला लागले आहे याची पर्वा कुणालाच नसते.
नोकरी, वाहन, राहते घर यावर हे कर्ज फेडणं अवलंबून असतं. व्यसनीव्यक्तीसाठी व्यसन ही एकमेव प्राथमिकता असते आणि त्यासाठी पैशाची तजवीज करणे हा एकमेव विचार त्याच्या डोक्यात सकाळी उठल्यापासून सुरु असतो. अशावेळी तुम्हाला व्यसनापासून दूर करण्यापेक्षा तुम्हाला व्यसन पुरवून मजा पाहणारी काही विकृत माणसेही तुमच्या अवतिभवती मित्र म्हणून वावरत असतात.
एकंदरीतच व्यसन तुम्हाला आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, भावनिक अशा सर्व आघाड्यांवर पोखरण्यास सुरुवात करते. व्यसनाकडे वळण्याची आणखिही अनेक कारणे आहेत. त्यांची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर