नमस्कार,
व्यसनी माणसाचे विचार कसे चालतील हे ब्रह्मदेवही सांगू शकेल असे वाटत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या चमत्कारिक विचारांसमोर घरचेही मान तुकवताना दिसतात. उदाहरण द्यायचं झालं तर माणसे व्यसनाची तुलना करतात. ड्रग्जचं व्यसन अतिभयंकर. त्यामानाने दारुचं कमी भयंकर, त्यातूलनेने तंबाखुचं अगदीच निरुपद्रवी अशी काहीतरी चमत्कारिक विचारसरणी लोकांमध्ये सोयिस्करित्या पसरलेली असते. खरं तर असं काहीच नसतं. सर्व व्यसनांचे परिणाम सारखेच भयंकर असतात.
पण त्यामुळे मुक्तांगणमध्ये दाखल झाल्यावर माणसे आता आपण दारुसारखे मोठे व्यसन सोडणार मग तंबाखुसारखे छोटे व्यसन सुरु ठेवायला काय हरकत आहे असा विक्षिप्त विचार करु लागतात. आणि घरचे जेव्हा भेटायाला येणार असतात तेव्हा त्यांना तंबाखु आणायला सांगतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काहीजण हे मान्यही करतात.
मुक्तांगणमध्ये निकोटीनवर बंदी आहे. त्यामुळे भेटायला येणारे तंबाखु लपवून आणू पाहतात. आणि पकडले जातात. आपल्या माणसाने व्यसन सोडावे म्हणून घरच्यांनी त्याला कळकळीने मुक्तांगणला दाखल केलेले असते.मुक्तांगणची माणसे दाखल झालेल्याला व्यसनातून बाहेर काढायला धडपडत असतात आणि घरचे चोरून आपल्या माणसाला व्यसन पुरवण्याचा प्रयत्न करतात. असे अतिचमत्कारिक चित्र अशावेळी दिसु लागते.
व्यसनमुक्तीच्या दरम्यान आणखी कशा तर्हेचं असत्याचरण घडतं याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर