फक्त आजचा दिवस – ५७ – सत्य आणि असत्य

नमस्कार,

सत्य आणि असत्य या दोन्ही गोष्टी अनुक्रमे व्यसनमुक्ती आणि व्यसनाशी निगडीत आहेत. नीट बारकाईने लक्ष दिलं तर आपल्या ध्यानात येईल की व्यसनाची सुरुवात होते तेव्हा व्यसनी माणसाच्या स्वभावात असत्य हे पहिल्या क्रमांकावर आढळून येतं. त्याला सारं काही लपवायचं असतं. आणि जेव्हा माणसाचे पहिले पाऊल व्यसनमुक्तीच्या दिशेने पडते तेव्हा त्याला सत्य हे आपल्या आयुष्यात पहिल्या क्रमांकावर आणावंच लागतं. कुठल्याही तर्‍हेची लपवाछपवी करून व्यसनमुक्ती साधता येत नाही.

गांधी तत्त्वांचा आपण वेगळ्या सदरात सविस्तरपणे विचार करणारच आहोत. येथे मात्र आपण व्यसनी माणसाच्या रोजच्या आयुष्यातील असत्य आणि व्यसनमुक्ताच्या रोजच्या आयुष्यातील सत्यतेचा विचार करुयात. सत्य या तत्वाला फार मोठी अध्यात्मिक बाजूही आहे. ज्याचा सध्या आपल्याला विचार करायचा नाही. आपण व्यसनमुक्तीच्या संदर्भातच सत्याचा विचार करणार आहोत.

बर्‍याचा विचार करताना वाईटाचाही विचार करावा लागतो. त्याच प्रमाणे सत्याचा विचार करताना असत्याचीही चर्चा करावी लागेल. या सर्व चर्चेचा मतितार्थ वाचकांनी स्वभावदोष आणि त्यातील आवश्यक बदल या दृष्टीने घ्यावा असे मला वाटते. तेव्हा सत्य आणि असत्य यांचे महत्त्व व्यसनमुक्तीच्या संदर्भात काय आहे याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...