नमस्कार,
मुक्तांगणमध्ये व्यसनमुक्तीसाठीचे उपचार हे गांधी तत्त्वांवर आधारलेले आहेत हे आपल्यापकी अनेकांना ठावूक असेलच. मोठ्या मॅडमनी म्हणजेच डॉ. अनिता अवचट यांनी अतिशय कौशल्याने ही तत्त्वं व्यसनमुक्तीच्या उपचारांमध्ये गुंफली. आज कुठल्याही व्यसनाच्या उपचारांकडे बारकाईने लक्ष दिले तर दिसून येईल की शब्द आणि भाषा वेगळी असेल कदाचित पण मूलतः गांधी तत्त्वांचाच विचार त्यात केला आहे. आपण काल व्यसनातील कर्जबाजारीपण आणि खोटेपणा याबद्दल बोलत होतो. मात्र व्यसनात खोटेपणा हा नुसत्या पैशांसाठी फसवणूक करणे या एकाच बाबतीत वापरला जातो असे नाही तर बहुतांश व्यसनाचा संपूर्ण प्रवास हा खोटेपणाचाच प्रवास असतो.
यासाठी गांधीतत्वातील पहिले तत्त्व “सत्य” याची कास आपल्याला व्यसनमुक्ती हवी असेल तर धरावीच लागते.
व्यसनाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा पहिला विचार माणसाच्या मनात येत असेल तो म्हणजे व्यसन लपवायचे कसे याचाच. जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला आपल्या प्रेमाच्या माणसांपासून लपवून कराविशी वाटते तेव्हाच तेथे काहीतरी काळेबेरे दडलेले आहे असे समजावे. तुमच्यातली आणि कुटुंबामधली पारदर्शकता नाहिशी होण्याची सुरुवात तेथून होते. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट लपून करु लागता तेव्हा खोटेपणाला सुरुवात होते.
खोटेपणा व्यसनात आणखी कोठे दडला आहे याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर