नमस्कार,
अनेकदा असे घडताना पाहिले आहे की कर्ज फेडता आले नाही की व्यसनी माणसाच्या घरी आणि कामावरदेखिल देणेकरी पोहोचतात आणि घरच्यांची परिस्थिती अवघड होऊन बसते. मोठ्या कष्टाने समाजापासून व्यसन लपवलेलं असतं ते एकदम असं अतिशय वाईटरित्या चव्हाट्यावर येतं. अशावेळी जी तगमग होते त्याचं एक कारण या कर्जबाजारीपणाची पाळमूळं किती खोल गेलेली आहेत ते फक्त आणि फक्त व्यसनी माणुसच सांगु शकतो आणि त्याला खोटं बोलण्याची सवय जडलेली असते. किंवा तो जरी खरं बोलत असला तरी त्याच्यावर कुणाचाही विश्वास बसत नाही.
ज्याप्रमाणे दारुच्या बाबतीत असे म्हटले जाते की “पहिला घोट घातक” तसेच पहिला खोटेपणाही घातकच. त्याचीही व्यसनी माणसाला सवय होऊन जाते. हा खोटेपणा करून अनेक जणांकडून व्यसनी माणसाने पैसे उकळलेले असतात. मित्र आणि नातेवाईक त्यामुळे दुर होऊ लागतात. या खोटेपणाचे धागेदोरे फार पुढे पोहोचतात. व्यसन सोडल्यावरही या खोटेपणामुळे झालेलं नूकसान पटकन भरून येत नाही. कारण माणसं व्यसनी माणसावर पुन्हा लगेच विश्वास ठेवत नाहीत. व्यसनमुक्तीच्या मार्गावर पुढे चालताना हा गमावलेला विश्वास मिळवणं सोपं नसतं.
खोटेपणामुळे व्यसनातील गुंतागुंत कशी वाढते याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर