नमस्कार,
कर्ज वाढत गेले की ते उघडकीला येतेच पण हा घरच्यांसाठी असह्य असा धक्का असतो. आधीच अनेकांची आर्थिक परिस्थिती व्यसनामुळे खिळखिळी झालेली असते. त्यात अनेक दिवस व्यसनी माणसाने चलाखीने कर्जाची गोष्ट लपवलेली असते. आणि अचानक आग्या मोहोळाला धक्का बसावा आणि त्या भयंकर चावणार्या माश्या आपल्याभोवती घोंगावू लागाव्या तसे एकामागोमाग एक घेणेकरी आपल्यासमोर येऊ लागतात. अजून या माणसाने कुणाकुणाचे पैसे घेतले असतील या सततच्या विचाराने घरच्यांची झोप उडत असेल तर त्यात काहीच आश्चर्य नाही.
आपल्याकडील कुटुंबव्यवस्था त्या मानाने अजूनही टिकून आहे. अनेकदा घरच्यांनी व्यसनी माणसाचे कर्ज फेडण्याची जबाबदारी घेतली अशीही उदाहरणे पाहिली आहेत. मात्र व्यसन सुटेपर्यंत या कर्जबाजारीपणाचा अंत होत नाही हे सर्वांनीच लक्षात घेणे आवश्यक आहे. व्यसनमुक्तीसाठी उपचार सुरु झाले तर आणि तरच कर्ज फेडण्याला काहीतरी अर्थ असतो. अन्यथा व्यसनी व्यक्तीचे व्यसन सुरुच आहे आणि तुम्ही कर्ज फेडत असाल तर खालून भोक असलेली टाकी पाण्याने भरण्याचा प्रयत्न करण्यासारखे ते फोल आहे हे नक्की. तुम्हाला आयुष्यभर कर्ज फेडत राहावे लागेल.
त्यामुळे यावर दोन्ही बाजूने उपाय करावे लागतात. एक तर कर्ज फेडणे आणि दुसरे म्हणजे लगेचच, त्याक्षणीच व्यसनावरील उपचारांना सुरुवात करणे. व्यसनी व्यक्ती पुन्हा कर्ज करून ठेवणार नाही याची खातरजमा केल्याशिवाय कर्ज फेडण्याला फारसा अर्थ राहात नाही.
कर्जबाजारीपणामुळे पुढे काय होते याची चर्चा आपण करुच.तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर