नमस्कार,
व्यसनातील बहुतांश कर्जबाजारीपणाची सुरुवात ही घरातले कुणीतरी गंभीर आजारी आहे आणि उपचारांसाठी पैशाची गरज आहे ही थाप ठोकून झालेली असते. त्यात काही मित्र आणि नातेवाईक गळाला लागतात. तर अनेकदा कामावरील सहकारीही फसतात. एका टप्प्यावर कर्जाचे डोंगर उभे राहतात. मग एकाकडून कर्ज घ्यायचं. दुसर्याचे थोडे पैसे फेडायचे आणि उरलेल्या पैशात व्यसन करायचे असे पैशांचे “मॅनेजमेंट” सुरु होते.
व्यसनी माणूस चलाख आणि हूशार असतो असे अनेकदा पाठपुराव्याच्या सभेत कौतूकाने सांगितले जाते आणि त्यावर लोक पसंतीची मानही डोलवून हसतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर तो चलाख नसता तरच त्याचे भले झाले असते असे मला मनापासून वाटते. कारण तो चलाख असतो म्हणूनच लवकर पकडला जात नाही आणि व्यसनाचा विळखा जास्त घट्ट बसतो. असो.
तर व्यसनीमाणसाची ही सर्व तथाकथित हूशारी कर्जबाजारी होण्यात वाया चाललेली असते. पुढे मोठ्यांनी सांगितलेल्या एक म्हणीचा प्रत्यय येऊ लागतो. “जगात कसलेही सोंग आणता येते पण पैशाचे सोंग आणता येत नाही”. कर्जबाजारीपणा उघडकीला येऊ लागतो. पुढे काय होते याची चर्चा आपण करुच.तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर