नमस्कार,
व्यसनाच्या बाबतीत “परदु:ख शीतल” असण्याची शक्यता असते हा मुद्दा मी आधी मांडला आहे. मात्र त्याचा अर्थ नीट समजून घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. याचे कारण व्यसनाबद्दल शास्त्रीय अशी फार थोडी माहिती लोकांना असते. त्यामुळे अनेकदा आपण इतके प्रयत्न करत आहोत पण घरच्या माणसाचे व्यसन काही सुटत नाही अशी घरच्यांची समजूत होऊ शकते. शिवाय शेजारी पाजारी आणि नातेवाईक, मित्रमंडळींनाही व्यसनी माणसाला व्यसन सोडायचेच नाही असे वाटू शकते.
व्यसनाचा चिवटपणा सांगताना व्यसनी माणसाला येथे दोषमुक्त करायचे नाहीये हे आधीच नमुद केलेले बरे. पण एकदा व्यसनाचा आजार जडला म्हणजे असंख्य दोषारोप करण्यापेक्षा त्याचे उपचारही आपण इतर आजारांप्रमाणेच केले पाहिजेत असे मला वाटते. माणसाला मधूमेह किंवा रक्तदाबाचा आजार जडल्यावर कुटूंबात एकमेकांवर दोषारोप होतात का? पण व्यसनाचा आजार जडल्यावर दोषारोपांची मालिकाच सुरु होते आणि त्यात शास्त्रीय उपचार करण्याचे वाहूनच जाते.
त्यामुळे या बाबतीत व्यसनी माणसाची हतबलता, त्याचे परावलंबित्व आणि घरच्यांना व्यसनाचा होणारा असह्य त्रास या गोष्टी अगदी ठळकपणे आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. यामुळेच व्यसन ही गोष्ट गुंतागुंतीची झालेली असते. ही गुंतागुंत काय असते याची चर्चा आपण पुढे करुच.तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर