नमस्कार,
घरात व्यसन असलं की तेथिल माणसांची परिस्थिती किती आणि कशी अवघडल्यासारखी होते यावर बरंच लिहिता येईल. विशेषतः शाळा कॉलेजमध्ये जाणार्या मुलांचा प्रचंड कोंडमारा होतो. कुठल्या मुलाला किंवा मुलीला आपले व्यसनी वडील गबाळ्या अवतारात रस्त्यावर उभे राहिलेले पहायला आवडेल? पण असे प्रसंग त्यांच्या आयुष्यात येऊ शकतात. अशावेळी मित्र मैत्रिणींसमोर अब्रु जाण्याची वेळ येते. व्यसनाच्या एका टप्प्यावर माणसाला खाण्यापिण्याचे भान नसते आणि कपड्यालत्त्याची शूद्ध नसते. अशा अवतारात वडील समोर आल्यास त्यांच्यात आणि मुलांच्या संबंधात तणाव निर्माण होऊ शकतो.
व्यसनी माणसाचे मन व्यसनामुळे इतके दुबळे झालेले असते की आपल्या वागण्याने आपण आपल्या मुलांची परिस्थिती अवघड करून ठेवतो आहोत हा विचार त्याच्या मनात येणे कठीण असते. अशा घरात मित्राला किंवा मैत्रीणीला कशासाठीही बोलावणं किंवा त्यांना बोलावून काही समारंभ साजरा करणं म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखंच असतं.
व्यसन हे माणसाने स्वतःहून विकत घेतलेलं दुखणं आहे पण त्याची झळ मात्र त्याच्यासकट इतर निर्दोष कुटुम्बियांनाही पोहोचते.
आणखी घरात काय काय घडते याची चर्चा आपण पुढे करुच.तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर