फक्त आजचा दिवस – ४८ – व्यसनातील अप्रामाणिकपणा

नमस्कार,

मुक्तांगणच्या एका ज्येष्ठ समुपदेशकांनी एक उदाहरण दिले होते. समजा सकाळी एखाद्या व्यसनी व्यक्तीला घरच्यांनी एखादी वस्तु आणण्यासाठी शंभर रुपये दिले तर तो त्यातील पंचवीस रुपये दारुला खर्च करेल आणि उरलेल्या पैशात घरच्यांनी सांगितलेली वस्तु आणण्याचा प्रयत्न करेल. याचा अर्थ त्याचा प्रामाणिकपणा पूर्णपणे संपलेला नसतो. मात्र तो व्यसनासमोर हतबल झालेला असतो. ही हतबलता समजण्यासाठी समाजाला व्यसनाबद्दलची शास्त्रीय माहिती असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा कायम वादविवाद होतच राहतील.

वरील उदाहरण व्यसनी व्यक्तीची बाजु घेण्यासाठी अथवा व्यसनाची किंवा त्याच्या कृतीची भलावण करण्यासाठी दिलेले नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. फक्त जेव्हा आपण म्हणतो की व्यसन हा एक आजार आहे तेव्हा आपल्याला त्याचा अर्थ खरोखर कळलेला असतो का हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. व्यसनात दीर्घ कालावधी काढल्यावर येणारे क्रेव्हींग किती जबरदस्त असते याची योग्य कल्पना आजुबाजुच्यांना असायला हवी.

अनेकदा असे म्हटले जाते कि खाण्याच्या काही असोसिएशन्स अतिशय स्ट्राँग असतात. कुठे मटणाचा वास आला तरी कदाचित पिण्याची आठवण येऊ शकते. दारु पिणारे त्यासोबत गोड खात नाहीत. त्यामुळे क्रेव्हींग आल्यास काहीजण गोड खाण्याचा सल्ला देतात. तसे केल्यास क्रेव्हींग निघून जाते असे म्हणतात. आमचे एक सहकारी रोजच्या दारु पिण्याच्या वेळी ताक पित असत. आणि ती वेळ बरोबर टाळत असत.

सांगण्याचा उद्देश हा की व्यसनामुळे येणारे क्रेव्हींग हा एक गंभीर विषय आहे. ते टाळण्यासाठी सोबर राहु इच्छिणारी मंडळी जीवाचा आटापिटा करीत असतात. याची आणखी चर्चा आपण पुढे करुच.तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...