फक्त आजचा दिवस – ४६ – आणाशपथा आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या

नमस्कार

काही घरांमध्ये व्यसनाच्या दरम्यान आणाशपथांचे सत्र चाललेले असते. व्यसनी माणुस सकाळी आपल्या प्रेमाच्या माणसाची शपथ घेतो आणि संध्याकाळी दारु पिऊन झोकांड्या खात घरी येतो. आणि या आणाशपथांमुळे घरच्यांचा विश्वास संपूर्णपणे गमावून बसतो. मात्र अशाच वेळी घरच्यांना व्यसन म्हणजे काय, क्रेव्हींग येणे म्हणजे काय असते याचे ज्ञान असणे आवश्यक आहे असे मला वाटते. जेव्हा व्यसनी माणुस आणाशपथा घेतो तेव्हा तो प्रत्येक वेळी घरच्यांना फसवतच असतो असे म्हणता येत नाही.

काहीजण तरी प्रामाणिकपणे दारु न पिण्याची शपथ घेत असतील. पण व्यसन हा एक अति चिवट असा आजार आहे. त्यातही क्रेव्हींग येणे म्हणजे काय भयंकर गोष्ट असते हे ज्यांना माहित नाही त्यांना व्यसनी माणसाचे वागणे खोटेपणाचे वाटणे साहजिकच आहे. व्यसनाचा पदार्थ न मिळाल्यास जी माणसाच्या जीवाची तगमग आणि घालमेल होते त्याला क्रेव्हींग येणे म्हणतात. त्या भरात माणसे काय वाटेल ते करतात. व्यसन मिळविण्यासाठी फार भयंकर गुन्हे माणसांच्या हातून घडतात.

मला एक उदाहरण माहित आहे ज्यात एक सोबर असणारा मुक्तांगणमित्र आपली गाडी गॅरेजमध्ये रिपेयर करण्यासाठी आला. काम छोटेसेच होते त्यामुळे तेथेच गाडी रिपेयर होण्याची वाट बघत बसला. समोर पाहिले तर त्याला बार दिसला. आणि लक्षात आले की व्यसन करताना त्याची ती नेहेमीची “बसण्याची” जागा होती. त्याच्या नकळत तो कधी त्या दिशेने चालु लागला त्याला कळले देखिल नाही. अचानक रस्ता ओलंडताना मध्येच एक स्कूटर आडवी आली आणि तो थांबला…भानावर आला आणि परत फिरला.

व्यसन हा कसा फसवा आणि धोकादायक आजार असतो याचे हे एक उदाहरण होते. व्यसनामुळे घरात आणखी काय घडतं याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...