फक्त आजचा दिवस – ४४ – व्यसन आणि मनोविकार

नमस्कार,

व्यसनी माणसाला मनोविकार असतात का? हा एक गहन प्रश्न आहे. यात दोन्ही शक्यता आहेत. काही मनोविकार आधीच असण्याची शक्यता असते. तर काहीवेळा व्यसनामुळे मनोविकार निर्माण झाल्याची शक्यता असते. पण येथे विचार करायचा आहे तो व्यसनी माणसामुळे घरच्यांमध्ये काही मनोविकार निर्माण होण्याची शक्यता असते त्याबद्दल.

घरात व्यसनामुळे सततचे ताणतणाव निर्माण होत असतात. माणसे सतत चिंताग्रस्त असतात. व्यसनी माणुस कधी काय करेल, कुठल्याप्रसंगी आपल्याला शरमेने मान खाली घालावी लागेल असे वागेल ते सांगता येत नाही. त्यामुळे घरातील लोक फार मोठ्या तणावाखाली वावरत असतात. स्त्रीयांना तर हा तणाव प्रचंडच असतो कारण त्यांना अपमान, भांडणं आणि मारहाण या गोष्टींनाही तोंड द्यावे लागते.

या सततच्या तणावाचे अपरिहार्य परिणाम घरच्यांच्या प्रकृतीवर होतात. माणसे शरीराने आजारी पडतातच पण मनानेही आजारी होतात. हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या झालेल्या खच्चीकरणामुळे घडते. तणावामुळे आत्महत्येचा प्रयत्न केलेली सहचरी मला ठावूक आहे. सततच्या चिंतेचा आणि नैराश्याचा तब्येतीवर वाईट परिणाम होतो.

याचे प्रमुख कारण व्यसनातील अनिश्चितता हे असते. व्यसनी व्यक्तीने आपला विश्वास पूर्णपणे गमावलेला असतो. हा विश्वास पुन्हा मिळवणे सोपे नसते. घरात आणखी काय घडतं याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...