नमस्कार,
ज्या घरात व्यसन असेल तेथे अनेकदा संशयी स्वभावाचा वावर असल्याचं दिसलं आहे. त्यामुळे पत्नीची परिस्थिती अत्यंत कठीण होऊन बसते. तिला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. त्यात जर सासु सासरे दोघे किंवा निदान एकतरी तिच्या बाजूने असेल तर ठीक. अन्यथा परीस्थिती अवघड झालेली असते.
अशावेळी जसजसे व्यसन वाढत जाते तसतसा संशयाला जोर येतो असे मला वाटते. कारण व्यसन वाढत जाते तसतसे माणुस आर्थिक, शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या खचत जातो. त्याला घरात कुणीही विचारत नाही. घरातल्या महत्त्वाच्या निर्णयात त्याचा सहभाग नसतो. बाहेर माणसे थट्टा तरी करतात किंवा तिरस्कार तरी करतात. अशावेळी पत्नीवर संशय घेऊन भांडण करणे ही एकमेव गाजवण्याजोगी मर्दुमकी उरलेली असते.
शिवाय व्यसनामुळे हतबल झाल्याने अनेक विचार डोक्यात येऊ शकतात. आता आपण सर्वांनाच नकोसे झाले आहोत हा विचार मनात आल्यावर संशयाचे भूत मानगुटीवर बसु शकते. घरात आणखी काय घडतं याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर