नमस्कार,
ज्या घरात व्यसन असतं त्या घरात लहान मुले असतील तर ती अत्यंत दुर्दैवाची गोष्ट असते. कारण ती सतत भेदरलेली असतात. काही तरुण वयाच्या उंबरठ्यावर असतात. घरात व्यसन असेल तर मुलांनाही ती सवय लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. याउलट काही वेळा व्यसनाबाबत मुलांना तिटकाराही उत्पन्न होऊ शकतो. व्यसनाने हिंसेचे स्वरुप धारण केले असेल तर परिस्थिती आणखीनच अवघड होऊन बसते. आपल्या आईशी वडील सातत्याने भांडतात, तिला मारहाण करतात हे जी मुलं पाहतात त्यांच्यावर या गोष्टींचा मानसिक परिणाम काय होत असेल याची कल्पनाही करवत नाही.
पण मला एक वेगळा मुद्दा येथे मांडायचा आहे. मी काहीवेळा अशा घरातील मुलांचे शेयरींग ऐकले आहे. ही मुले दुर्दैवाने अकाली प्रौढ झालेली दिसतात. ती मोठ्यामाणसांसारखे बोलतात. अनेकांना या गोष्टीचे कौतूकही वाटते. पण त्यांचे बालपण हरवलेले असते जे त्यांना पुन्हा मिळणार नसते. मलाही सुरुवातीला त्यांचे शेयरींग ऐकून कौतूक वाटायचे. पण नंतर वाईट वाटु लागले. झोपाळ्यावाचूनी झुलायच्या आणि फुलायच्या वयात त्यांच्या तोंडात सोबराईटी, व्यसन, स्लिप असले शब्द येणे ही काही फार चांगली गोष्ट आहे असे मला वाटत नाही.
घरात आणखी काय घडतं याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर