नमस्कार,
घरात व्यसनाचे भयंकर परिणाम दिसु लागले की “ब्लेमगेम” सुरु होण्याची शक्यता असते. व्यसनावरचे उपचार राहतात बाजुलाच आणि याला व्यसन कुणामुळे लागले यावर माणसे वाद घालु लागतात. भांडू लागतात. अशावेळी मुलाचे लग्न झाले नसेल तर आईवडिल एकमेकांवर आरोप करीत राहतात. पण लग्न झालेले असल्यास मुलाच्या पत्नीवर बोट रोखले जाते. चमत्कारिक गोष्ट अशी की आपला समाजदेखिल साळसूदपणे हे अप्रत्यक्षपणे मान्य करतो की मुलगीच नीट वागत नसेल कदाचित. तिच्या वागण्याचे त्याला टेन्शन येत असेल म्हणून नवरा प्यायला लागला असेल.
समजा लग्न अलिकडेच झालं असेल तर पत्नीवर पटकन आरोप करता येत नाही. मग तिच्यावर ती नवर्याला सुधारत नाही असा आरोप केला जातो. व्यसनाची कारणे सोयिस्करपणे दुर्लक्षिली जातात. थोडक्यात काय तर लोकांना कुणाच्यातरी डोक्यावर व्यसनाचं खापर फोडायचं असतं. आणि अशावेळी व्यसनी माणासाची पत्नी ही “इझी टार्गेट’ असते.
हे ब्लेमगेम सुरु असतानाच व्यसनावर उपचार केले पाहिजेत याकडे दुर्लक्षच झालेलं असतं. किंवा जे उपचार सुरु असतात ते शास्त्रीय नसतात. याचं कारण आपल्याला व्यसनाच्या चिवटपणाची पुरेशी माहितीच नसते. घरात आणखी काय घडतं याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर