नमस्कार,
व्यसन हा कुटूंबाचा आजार आहे असं म्हणतात ते अक्षरशः खरं आहे. कारण दारु व्यसनी माणसाच्या पोटात असते तर घरच्यांच्या डोक्यात असते. व्यसनी माणूस घरी नसेल तर तो आता काय करीत असेल. पिऊन कुठे पडला तर नसेल, कुठे तमाशा तर केला नसेल? आता कुठून तरी फोन येईल, काहीतरी वाईट बातमी येईल. शेवटी काय तर मन चिंती ते वैरी न चिंती असे म्हणतात ते उगाच नाही.
व्यसनातील ताणतणाव हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. व्यसनी माणुस व्यसनात असला की त्याला चांगल्या वाईटाचे भान राहात नाही. जेव्हा आपण व्यसनातील ताणतणावांचा विचार करतो तेव्हा घरातील स्त्रीचा वेगळ्याने विचार करावा लागतो. जात्याच भावनाशील असलेल्या घरातील स्त्रीयांना व्यसनाचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यातील सर्वात वाईट भाग हा अनिश्चितत्तेचा असतो आणि त्याचाच तणाव जबरदस्त असतो. व्यसनी व्यक्तीबद्दल कुठलीच खात्री देता येत नाही. आणि आधी फार वाईट अनुभव आलेले असतात. त्यामुळे एक फोन आला नाही किंवा व्यसनी व्यक्तीचा फोन बिझी आला, लागला नाही की घरच्यांच्या जीवाची घालमेल सुरु होते.
त्यातून अनेकदा असे घडते की व्यसनी व्यक्तीने ऐन सणासुदीच्यावेळी व्यसनाचा भयंकरपणा दाखवलेला असतो. त्यामुळे कुठलाही सण जवळ आला की घरातील स्त्री अस्वस्थ होऊ लागते. अशा तर्हेचे अनेक तणाव व्यसनामुळे घरात निर्माण होतात, होऊ शकतात. त्यांची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर