फक्त आजचा दिवस – ३ – मला सांगणारे तुम्ही कोण?

नमस्कार,

अनेकदा पाहिलंय की व्यसनीव्यक्तीच्या नाकावर अहंकार असतो आणि व्यसनी व्यक्ती अनेक गैरसमजांचे पिंजरे अंगावर बाळगत असते. व्यसनी व्यक्ती जर घरातील कमवती व्यक्ती असेल तर मग पैसा मी मिळवून आणतो ही अहंकाराची बाब ठरते आणि कुटुंबातल्या ज्या व्यक्ती कमवत नाहीत त्यांनी आपले सारे काही ऐकले पाहिजे आणि आपले कसेही वागणे सहन केले पाहिजे असे त्या व्यक्तीला वाटू लागते.

अशावेळी घर सांभाळण्यासारखे अतिशय महत्त्वाचे काम करणार्‍या सहचरीची फार कुचंबणा होऊ लागते. काही सहचरी कमवत्या माणसाने थोडी घेतली तर काय हरकत आहे असा विचार सुरुवातीला करतात आणि मग त्याचे रुपांतर व्यसनात झाले की पस्तावतात. मी पैसा कमवतो आणि माझ्या पैशाची पितो. तेव्हा मला दारु पिऊ नका हे सांगणारे तुम्ही कोण हा व्यसनी व्यक्तीचा प्रश्न असतो.

खरं तर व्यसनात पाऊल टाकले की चांगले, वाईट, योग्य, अयोग्य, इष्ट अनिष्ट यांच्या सीमारेषा व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत धूसर ठरु लागतात. आणि एरवी प्रेमाची असलेली माणसे दारु सोडण्याबाबत बोलू लागली की त्याला ती शत्रू वाटू लागतात. व्यसन करताना आपली घसरगुंडी होत चालली आहे हे त्या व्यक्तीला कळत नसले तरी प्रेमाच्या माणसांना दिसत असते आणि त्या काळजीपोटीच ही माणसे समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असतात.

अनेकदा हे प्रेमाचे उपदेश अळवावरच्या पाण्यासारखे वाहून जातात. असे का घडते याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...