नमस्कार,
आपल्याकडे समाजाची स्त्रीकडून अशी अपेक्षा असते की तिने सर्व छळ सहन करूनही नवर्याला सुधारावे. या पुरुषप्रधान मानसिकतेचे दुष्परिणाम अनेक होतात. स्त्रीवर याचा जबरदस्त तणाव असतोच पण त्यामुळे स्त्रीमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते. आपणच कुठेतरी कमी पडलो. हा सर्व आपलाच दोष आहे या भावनेने स्त्रीच्या मनात मूळ धरले म्हणजे तिचे मानसिक स्वास्थ्य हरपलेच म्हणून समजावे.
बरं सांभाळून घ्यायचं इतकं म्हणून माणसं थांबतात. सांभाळून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं हे कुणीच सांगत नाही. कारण ते अडचणीचं असतं. सांभाळून घ्यायचं म्हणजे काय करायचं? रोजची मारहाण, भांडणं, अपमान सहन करायची का? मग व्यसन करणार्या पुरुषाची जबाबदारी काहीच नाही का?
त्यातही अत्यंत चमत्कारिक भाग म्हणजे लग्न केलेली स्त्री ही काल परवाच तुमच्या घरात बाहेरून आलेली असते. तुमचा व्यसनी मुलगा तुमच्याकडे लहानपणापासून असतो. मग यात आईवडीलांची जबाबदारी येते त्याचं काय? असे अनेक प्रश्न आहेत. त्यांची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर