फक्त आजचा दिवस – ३७ – लग्न केल्यावर सुधरेल

नमस्कार,

लग्न केलं की काही आजार जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे नाहिसे होतात ही समजूत आजही आपल्या समाजात मूळ धरून आहे. त्यामुळे मुख्य समस्या बाजूलाच राहते आणि एका स्त्रिच्या आयुष्याचा खेळखंडोबा होतो. व्यसनाच्या बाबतीत वेगळी गोष्ट नाही. व्यसनात बुडालेल्या माणसाचं लग्न केलं, घरात बायको आली कि मन घरात रमेल. मुलं बाळं झाली की जबाबदारीची जाणीव होईल ही विचारसरणी वरवर कितीही नेमस्त आणि उदार वाटली तरी बरोबर नसते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. पत्नी म्हणून घरात येणार्‍या एका स्त्रिच्या आयुष्याची वाट लावण्याचा आणि तिला अपार दु:ख देण्याचा आपल्याला काय अधिकार आहे याचा विचार कुटुंबियांनी करायला हवा.

सोबर असलेल्या आणि व्यसनमुक्तीपथावर ठामपणे चालणार्‍या व्यक्तीचे लग्न जमवणे आणि व्यसनात बुडालेल्या व्यक्तीचे लग्न लावून देणे यात जमीन आस्मानाचा फरक आहे हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. आपण बोलत आहोत ते व्यसन सुरु असलेल्या व्यक्तीच्या लग्नाविषयी.

आपल्याकडे आजही पुरुषप्रधान समाजात स्त्रिचे दुय्यम स्थान हे पुरुषांच्याच नव्हे तर स्त्रिच्याही विचारसरणीत दिसून येते. पुरुष म्हटला की त्याला असा पिण्याचा, सिगारेट ओढण्याचा छंद असायचाच. एखाद्या पेगने व्यसन लागत नाही. पुरुष म्हटला की तो रागीट असणारच. कधीतरी हात उचलला तर मनावर घ्यायचं नाही. सासरी नांदायचं म्हणजे थोडेफार त्रास सहन करावेच लागतात. ही अशा तर्‍हेची विचारसरणी म्हणजे भविष्यात संकटाला आमंत्रण आहे.

आणि त्यातूनही लग्न झालंच तर घरच्यांचीच नव्हे तर आपल्या समाजाचीही धारणा पत्नीने पतीला सुधारावे अशीच असते. या चमत्कारिक धारणेबद्दलची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...