फक्त आजचा दिवस – ३६ – आमचे हे जराशीच घेतात

नमस्कार,

सोशल ड्रिंकिंग बाबत समाजात बरेच गैरसमज आहेत. वर्षानूवर्षे मर्यादेत राहून सोशल ड्रिंकिंग करणे ही निर्व्यसनी राहण्याची गॅरेंटी नसते हे पक्के लक्षात घेणे आवश्यक आहे. आमच्या समोर वीस वीस वर्षे लिमिटमध्ये राहून सोशल ड्रिंकिंग करणारे अचानक व्यसनी झाल्याची उदाहरणे आहेत. एका सहचरीला लग्नाआधी आपल्या पतीला दारु पिण्याची सवय आहे हे माहित होते. पण तसे थोडेफार ड्रिंक काय अनेक जण करतात अशी समजूत तिने करून घेतली आणि पुढे व्यसनाच्या भीषण परिणामांना तिला सामोरे जावे लागले.

व्यसनाच्या बाबतीत फार जागरुक असणे आवश्यक असते. अनेकदा काही सवयींचे व्यसनात रुपांतर झाल्यावरच पालकांच्या लक्षात येते. यासारखी दुर्दैवाची दुसरी गोष्ट नाही. आज दारु प्यायली किंवा सिगारेट ओढली आणि उद्या व्यसन लागले असे होत नाही. त्यासाठी काही काळ जावा लागतो. ज्याअर्थी आपल्याला गोष्ट व्यसनाच्या थराला जाईपर्यंत कळली नाही याचा अर्थ आपण पुरेसे जागरुक नव्हतो किंवा आपल्याला समस्येचे पुरेसे गांभीर्य लक्षात आले नव्हते इतकाच होतो.

व्यसन कसे चोरपावलाने माणसाच्या आयुष्यात प्रवेश करते चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...