फक्त आजचा दिवस – ३३ – व्यसनाबाबतचे प्रचंड अज्ञान

नमस्कार,

गेली काही वर्षे व्यसनमुक्तीपथावर चालणार्‍यांचे शेयरींग्ज ऐकल्यावर माझी अशी खात्री झाली आहे की व्यसनमुक्तीचा एक मोठा शत्रू आहे तो म्हणजे आपल्या समाजात त्याबद्दल असलेले भयानक अज्ञान. हे इतके भयंकर आहे की त्यामुळे व्यसन लागल्यावर योग्य शास्त्रीय उपाय करण्याऐवजी माणसे इतरच अनेक गोष्टी करीत राहतात. बहुमोल वेळ वाया घालवतात. व्यसनाचा विळखा आणखी घट्ट होतो. आणि त्यामुळे व्यसनी माणसाची शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि कौटूंबिक परीस्थिती आणखी खालावते.

व्यसन हा तापासारखा एखादे औषध घेतल्यावर जाणारा आजार नाही. त्यामुळे ते आपोआप बरे होईल या भ्रमात कुणी राहू नये हेच खरे. त्यासाठी अद्यापतरी वैद्यकिय क्षेत्रात औषध निघाले नाही. व्यसनाचा आपल्या मानसिकतेशी घनिष्ठ संबंध आहे. शिवाय त्याचे काही धागेदोरे हे तुमच्या सामाजिक वातावरणाशीही निगडीत असतात.

थोडक्यात काय तर व्यसन ही एक गुंतागुंतीची बाब आहे. त्याचे भयंकर परिणाम तर आपल्याला दिसत असतातच. पण या सगळ्यांमध्ये सुखावणारी एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की व्यसनमुक्ती होऊ शकते. त्यासाठी उपाय आहेत. मात्र हे उपाय करण्याची इच्छा, मनापसून तळमळ असावी लागते. आपल्या समाजात मात्र अनेकदा माणसे शेवटचा मार्ग म्हणून शास्त्रीय उपायांकडे वळलेली आढळतात ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.

शास्त्रीय उपाय करण्याआधी माणसांचे विचार कसे असतात याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...