फक्त आजचा दिवस – ३२ – चांगले मित्र का हवेत?

नमस्कार,

एका मुक्तांगणमित्राने शेयरींग करताना सोबराईटी राखण्यासाठी तो काय करतो हे सांगितले. त्याला ऑफीसमधून संध्याकाळी दारु प्यायला जाण्याची सवय होती. त्याने निर्व्यसनी मित्राच्या सोबतीने संध्याकाळी ऑफीसमधून बाहेर पडणे सुरु केले त्यामुळे त्याचे पाय बारकडे वळेनासे झाले. आणि तो थेट घरी जाऊ लागला. म्हटलं तर उपाय अगदी साधा होता. पण अत्यंत परिणामकारक होता. चांगले मित्र हवेत ते यासाठी!

समजा या जागी एखादा वाईट माणूस असता तर त्याने तुम्हाला पुन्हा व्यसनाकडे खेचले असते. माणसे अनेक तर्‍हेने तुम्हाला व्यसनाकडे खेचू शकतात हे लक्षात घ्यायला हवे. पार्टीला बोलावणे, आग्रह करणे हे तर असतेच. पण स्वतःच्या खर्चाने बारमध्ये नेऊन प्यायला बसवणे. व्यसनासाठी पैसे उधार देणे किंवा उधारीचे मार्ग दाखवणे हे देखिल व्यसनाकडे खेचण्याचे मार्ग असतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

चांगला मित्र तुम्हाला व्यसनापासून दूर ठेवेल. व्यसनापासून दूर राहण्याचे उपाय आपल्यापरीने सुचवेल. निर्व्यसनी माणसांचा सहवास हा सोबर राहायची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी औषधाप्रमाणे असतो अशी माझी समजूत आहे.

निर्व्यसनी राहाण्याबाबतही समाजात अनेक गैरसमज आढळतात. ते कोणते याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...