नमस्कार,
तुम्ही व्यसनमुक्तीकेंद्रातून बाहेर आल्यावर तुम्हाला व्यसनाकडे पुन्हा खेचणारे भेटू शकतात. त्यांच्यापासून सतत पळ काढत राहणे हा योग्य मार्ग नसतो. पळ काढत राहण्याने मनावरचं दडपण वाढतं. त्यापेक्षा या गोष्टींना तोंड देणे केव्हाही चांगले. मला येथे डॉ. आनंद नाडकर्णी यांनी एकदा दिलेलं उदाहरण द्यावंसं वाटतंय. समजा तुम्हाला एखाद्या अशाच मित्राने फोन केला आणि कुठेतरी पार्टी करण्याची कल्पना फोनवर सांगितली. तर न चिडता अगदी शांतपणे मात्र ठामपणे सांगावे “मी दारु कायमची सोडली. मी येणार नाही.” आणि फोन ठेवून द्यावा.
यापुढेही जर तुम्ही गुळुमुळु बोलत राहाल, नसती निमित्त सांगत राहाल तर मात्र समोरचा पटकन तुमचा दुबळेपणा ओळखतो आणि तोही संभाषण सुरु ठेवतो. याबाबत भीडस्तपणा अत्यंत धोकादायक. व्यसनाचा विषय तत्काळ तोडूनच टाकावा. त्यावर बोलणे सुरु ठेवू नये. एकदा तुमच्या वृत्तीतला ठामपणा दिसला की समोरचा माणुस तुमच्याशी बोलताना दहावेळा विचार करेल हे नक्की.
असे ठाम वागणे महत्त्वाचे का असते याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर