नमस्कार,
व्यसनमुक्त झाल्यावर काही विकृत माणसे आपल्या आजूबाजूला अशी असतात की त्यांना तुम्हाला पुन्हा व्यसनाकडे ढकलण्यात आनंद वाटत असतो. अनेकदा ज्यांच्याबरोबर तुम्ही भूतकाळात अनेक वर्षे व्यसन करण्यात घालवलेली असतात त्यांच्यात अशी माणसे असण्याची शक्यता असते. ही माणसे इतकी वाईट असतात की प्रसंगी स्वतः पैसे खर्च करून देखिल ते दारु आणून देतात आणि घरच्यांच्या, उपचारकेंद्राच्या आणि त्या व्यसनी व्यक्तीच्या मेहनतीवर पाणी फिरवतात.
तुम्हाला जी माणसे व्यसनाकडे खेचत असतात त्यांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. ती माणसे तुम्ही किती पाण्यात आहात ते जोखत असतात. तुम्ही लेचेपेचे आहात असा संशयदेखिल आला तर ते तुमच्या बोकांडी बसलेच म्हणून समजा. तुमचं बोलणं, चालणं, वागणं या सार्यात एक प्रकारचा निश्चय आणि ठामपणा दिसणे आवश्यक आहे. मऊ लागले की खणून काढण्याची यांची वृत्ती असते. त्यामुळे “अखंड असावे सावधान” हेच खरे.
एक उदाहरण घेऊन ठाम वागणे म्हणजे काय याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर