नमस्कार,
आपण कुणाला मित्र म्हणावे याबद्दल एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे. व्यसनमुक्तीच्या बाबतीत तर फारच. फार छोट्या छोट्या गोष्टींनी माणुस हळवा होऊन स्लिप होऊ शकते. तुम्हाला मदत मिळू शकते ती तुमच्या समुपदेशकांकडून, कुटुंबाकडून किंवा ज्यांना तुमचं भलं व्हावं असं वाटतं अशा हितचिंतकांकडून. पण आपल्या समाजात दुर्दैवाने अशी माणसे कमी आढळतात.
समजा एखादा माणुस प्रदीर्घ काळ व्यसनात राहून आता उपचार घेऊन बाहेर आला आहे. व्यसनाच्या दरम्यान त्याचे आर्थिक, शारिरीक, मानसिक असे सर्व स्तरांवर नुकसान झालेले आहे.अशावेळी त्याला नुसते व्यसनमुक्तच राहायचे असते असे नव्हे तर या सर्व आघाड्यांवर झालेले नुकसान देखिल भरुन काढायचे असते. पण जेव्हा तो व्यसनाकडे जाण्यास नकार देतो तेव्हा काय घडते?
“सभ्य लोक आले” अशी त्याची हेटाळणी त्याच्या पूर्वीच्या व्यसनी मित्रांकडून केली जाते. व्यसनातून सुटायला धडपडणार्याची “बेवडा” म्हणून संभावना करणारेही कमी नसतील. अशावेळी मनाला वेदना होतात. त्यामुळे आपली भूमिका ठाम असणे आवश्यक असते.
अशावेळी ठामपणे वागणे म्हणजे काय याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर