नमस्कार,
मित्र हा व्यसनात आणि व्यसनमुक्तीत एक महत्त्वाचा भाग असतो. ही सुदैवाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे. सुदैवाची यासाठी की चांगला मित्र असेल असेल तर व्यसनमुक्तीत तुम्हाला त्याची फार मदत होऊ शकेल. वाईट मित्र असेल तर व्यसनाच्या मार्गावर पुन्हा नेण्याचं भय तुम्हाला नेहेमी भेडसावत राहिल. बाकी जेव्हा तुम्ही एखाद्याला मित्र म्हणता तेव्हा तो चांगलाच असायला हवा. वाईट असेल तर तो मित्र कसा असणार? तो तुमचा शत्रूच असेल.
त्यामुळे व्यसनमुक्तीच्या पथावर वाटचाल करीत असताना आपला मित्र कोण हे ओळखणे आणि त्याप्रमाणे वागणे अत्यावश्यक आहे. ज्याला व्यसनमुक्तीतले अडथळे दूर करायचे आहेत त्याने व्यसनाकडे नेणारे तथाकथित मित्र आधी दूर केले पाहिलेत हे पक्के लक्षात ठेवावे. अनेकांना आपल्या भीडस्त स्वभावामुळे मित्रांना नकार देणं जमत नाही त्यांनी आधी ठाम नकार देण्यास शिकावे. काही अडथळे हे स्वतःच पार पाडावे लागतात.
मित्रांच्या बाबतीत सावध कसे राहावे याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर