फक्त आजचा दिवस – २४ – त्रास देणारे अविवेकी विचार

नमस्कार,

व्यसनाच्या दरम्यान व्यसनी माणसाच्या घरातील मंडळी अतोनात त्रास सहन करीत असतात. हे त्रास कुठल्या प्रकारचे असतात यावर स्वतंत्र पुस्तकच लिहिता येईल. वृद्ध मंडळी ताण सहन करु शकत नाहीत त्यामुळे ती शारिरीक, मानसिक दृष्टीने खचतात आणि आजारी पडू लागतात. पत्नीचेही तसेच. तिला व्यसनी व्यक्तीकडून मारहाण होत असण्याची शक्यता असते. वाद, भांडण, अपमान तर रोजचेच असतात. त्यातून चिंताग्रस्तता, नैराश्य यासारखे विकार जडतात. शारिरीक व्याधीही जडू शकतात.

याशिवाय आत्महत्येचे विचार मनात येणे हा एक मोठा धोका सहचरीच्याबाबतीत संभवतो. घरात लहान मुले असतील तर त्यांची कहाणी अतिशय करूण असते. ती अकाली प्रौढ होतात. त्यांचे बालपण हरवते. कोळपून जाते.

आपल्यावर जी माणसे प्रेम करतात त्यांना व्यसनामुळे भयानक त्रासाला सामोरे जावे लागते हे व्यसनी व्यक्तींनी मनात कोरून ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यसनमुक्तीच्या पथावर चालताना कुठलाही विचार व्यसनाकडे नेणारा आढळला तर तो विचार अविवेकीच असतो असे पक्के समजून असावे. आणखि अविवेकी विचार कुठल्या प्रकारचे असतात याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...