नमस्कार,
आपल्याला व्यसनाकडे नेणारे विचार हे अविवेकीच असतात. मात्र ऐन व्यसनाच्या काळात व्यसनीव्यक्तीला विवेकाचं भान नसतं त्यामुळे विवेकी विचार कुठले अविवेकी कुठले याची समज त्याला असणे कठीणच. मात्र व्यसनमुक्तीच्या पथावर वाटचाल करीत असताना आपल्या विचारांना तपासून पाहणे ही अत्यावश्यक बाब मानायला हवी. आणि त्यातच आपल्याला व्यसनाकडे नेणारे विचार कुठले हे पाहायला हवं असं मला वाटतं.
उदाहरणार्थ मला समजा व्यसन सोडून एक वर्ष झालं आहे तर माझ्या मनात व्यसनाचे विचार येत आहे का? अतिआत्मविश्वास वाटतो आहे का? एखादा पेग घेतल्याने काही होणार नाही असे वाटते आहे का? आता थोडीशी घेतली तरी आपण स्वतःवर कंट्रोल ठेवू शकतो असे वाटते आहे का? व्यसनाच्या बाबतीत प्रयोग करावेसे वाटताहेत का? अशा तर्हेने आत्मपरीक्षण आवश्यक आहे. हे सारे विचार अविवेकी आहे हे पक्कं समजून घ्यावं. कारण ते तुम्हाला व्यसनाकडे नेत असतात.
असे विचार मनात आल्यास फार काळ घोळवतही ठेवू नयेत. आपल्या प्रेमाच्या माणसांकडे किंवा समुपदेशकाकडे व्यक्त करावेत. आणखी कुठले विचार अविवेकी असतात याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर