नमस्कार
व्यसनीव्यक्तीच्या मनात नाना तर्हेचे विचार असु शकतात. अलिकडेच महेंद्र कानिटकरसरांचे “अविवेकी विचार” या विषयावर भाषण ऐकले. त्यात सरांनी आपल्या आयुष्यातील अनुभवांचे दाखले देऊन हा विषय समजवला होता. अविवेकी विचार कुठला हे ठरवण्याचे त्यांनी काही निकष सांगितले होते. त्यातील एक निकष असा होता की जो विचार आपल्या शरीराला अस्वास्थ्याकडे, रोगाकडे नेतो तो अविवेकी विचार. अविवेकी विचारांची ही एक व्याख्या ऐकल्यावर आपल्याला पटकन लक्षात येईल की व्यसनाचे विचार हे पूर्णपणे अविवेकीच आहेत.
मात्र हे अविवेकी विचार माणसावर स्वार झालेले असतात. इतके की माणूस व्यसनामुळे पुन्हा पुन्हा आजारी होऊनदेखिल व्यसनाकडे वळत राहतो. काही सुदैवी माणसे मुक्तांगणसारख्या ठिकाणी दाखल होतात. त्यांना व्यसनाकडे नेणार्या विचारांना तपासण्याची, त्यावर काम करण्याची संधी मिळते. जे तितके सुदैवी नसतात त्यांचे नुकसान होते.
अनेकदा शेयरींग करताना आपल्याला जे काही भयंकर शारिरीक त्रास व्यसनामुळे झाले त्याचे वर्णन आपले रिकव्हरींग अॅडिक्टस करत असतात. ते ऐकून अंगावर काटा येतो. इतका त्रास होऊनही माणसे पुन्हा पुन्हा व्यसनाकडे का वळतात याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर