फक्त आजचा दिवस – १९ – त्याला इथे आणणं कठीण आहे हो…

नमस्कार,

मुक्तांगणचे रिसेप्शन म्हणजे एक ज्ञान मिळवण्याची शाळाच आहे. तिथे काहीही न बोलता शांतपणे बसलं तरी अनेक गोष्टी कळतात. तसंच पाठपुरावा मिटिंगमध्येही अनेक गोष्टी कळतात. अनेकदा पालक भेटायला येतात. त्यांना आपला मुलगा व्यसनी आहे हे माहित असतं. त्याबद्दल खात्री असते. पण त्याला उपचाराला मुक्तांगणमध्ये आणणं ही अत्यंत अवघड गोष्ट वाटते.

मी अनेक केसेस मध्ये हा प्रकार पाहिला आहे. घरच्या माणसांना व्यसन माहित असतं. त्यांना आपल्या माणसावर उपचार व्हावेत हे देखिल मनापासून वाटत असतं पण त्याला इथे आणणे अशक्य वाटते. मुक्तांगणची माणसे घरी येऊन कुणालाही गाडीत घालून घेऊन जात नाहीत. घरचे या बाबतीत अत्यंत अगतिक झालेले असतात.

अशावेळी ठामपणा हा एकमेव उपाय असतो. आपला मुलगा कितीही लाडाचा असु देत पण अशावेळी नरमाईने वागणे म्हणजे त्याच्याच जीवाशी खेळ आहे नाही का? औषध कितीही कडू वाटले तरी बरे होण्यासाठी आपण घेतोच. तेव्हा डॉक्टरला कुणीही मला हे औषध नको असे म्हणत नाही. त्याचप्रमाणे मुलाला मुक्तांगणमध्ये आणणे ही कितीही अवघड गोष्ट वाटली तरी ती केलीच पाहिजे. त्यासाठी पायरी पायरीने काही उपाय करता येतात आणि त्यासाठी मुक्तांगणकडून तुम्हाला मार्गदर्शनही मिळू शकतं.

मुक्तांगणमध्ये आपल्या माणसांना आणणे हे कुटूम्बियांना अवघड का वाटते याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...