नमस्कार,
व्यसनातील बहुतेक मंडळी ही डिनायलमध्ये असतात. आपल्याला व्यसन नाहीच असे त्यांना वाटते. त्यापैकी बरेच जण मुक्तांगणला आल्यावर असहकार पुकारतात. कुणी जेवतच नाही तर कुणी कार्यक्रमांमधे भागच घेत नाहीत. पण चार दोन दिवसांनंतर बहुतेकजण विरघळतात. व्यसनामुळे इतरांचे काय हाल झाले ते समोर दिसत असते. मग ते हळुहळु व्यसनमुक्तीच्या वाटेने चालु लागतात.
पण काहीजण मात्र शेवटपर्यंत घरच्यांवर डूख धरून बसतात. आपल्याला येथे आणून दाखल केले ही गोष्ट त्यांना सहन होत नाही. आणि उपचारानंतर आपण पुन्हा व्यसन करून दाखवूच अशी काहीतरी चमत्कारिक गाठ ते मनाशी बांधतात आणि उपचारकेंद्रातून बाहेर पडल्यावर नेमके तसेच वागून दाखवतात.
अशावेळी आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे ते स्वतःसाठी. दुसर्यासाठी नव्हे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आपण व्यसनमुक्त राहून जगावर नव्हे तर स्वतःवर उपकार करणार आहोत हे देखिल लक्षात घेणे आवश्यक आहे.
व्यसन सोडण्याच्या बाबतीत माणसे असा आडमुठेपणा का करतात याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर