नमस्कार,
मुक्तांगणमध्ये उपचार घेऊन आल्यावर काही सूचना केल्या जातात. त्यापैकी एक सूचना असते धोक्याच्या दिवसांबद्दल. आपल्याकडे काही सण हे दारु पिण्याशी निगडीत आहेत. उदाहरणार्थ होळी, धूळवड, गटारी अमावास्या, ३१ डिसेंबर वगैरे. अशावेळी काही जण मुक्तांगणलाच एकदोन दिवस येऊन राहतात. आणि हा धोक्याचा दिवस पार पडला की परत आपल्या घरी जातात. मुक्तांगणमधून उपचार घेतलेल्या बहुतेकांना हे माहित असेलच.
मला यातील तत्त्व महत्त्वाचं वाटतं. मला हा दिवस टाळण्यासाठी मुक्तांगणला येणारी माणसं दुबळी वाटत नाहीत. उलट मला त्यांनी व्यसनाचा सकारात्मकरित्या केलेला स्विकार महत्त्वाचा वाटतो. समजा एखादा अगदी त्याहीवेळी घरी राहिला आणि मित्रांच्या आग्रहाला बळी पडला तर रिलॅप्स ही ठरलेलीच. मग विषाची परीक्षा घ्यायचीच कशाला?
शिवाय ज्या दिवशी समाजात दारु पिण्याची परंपरा असल्यासारखेच सगळे झिंगलेले असतात तेव्हा तुम्हाला तुमचे मित्र फोन करुन, घरी येऊन आग्रह करणार नाहीत कशावरून? अशावेळी आगीत हात घालण्यापेक्षा त्यापासून सुरक्षित अंतरावर राहणे केव्हाही चांगलेच.
तथाकथित मित्र तुम्हाला व्यसनाकडे कसे ओढून नेतात त्याबाबत चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर