नमस्कार,
पाठपुराव्याला अनेकदा नवीन माणसेही येतात. त्यांना आपल्या माणसाला मुक्तांगणमध्ये दाखल करायचं असतं. त्यांच्या चेहर्यावर चिंता, काळजी आणि काहीवेळा अविश्वास देखिल असतो. कारण ही माणसे व्यसनाच्या दु:खाखाली पिचून गेलेली असतात. बहुतेकदा सर्व उपाय करुन झाल्यावर शेवटचा उपाय म्हणून ही मंडळी येथे आलेली असतात. व्यसनी माणसाला जर तो आणण्याच्या परिस्थितीत असेल तर त्यालाही आणले जाते. येथलं काही ऐकून डोक्यात प्रकाश पडावा म्हणून.
अशाच एका प्रसंगी मला व्यसन किती चिवट असते याचा अक्षरशः साक्षात्कारच घडला म्हणा ना. एक बाई आपल्या नवर्याला घेऊन आल्या होत्या. त्यांच्या चेहर्यावर काळजी पसरली होती. आणि नवरा तर आपण त्या गावचेच नव्हे अशा तर्हेने बसला होता. त्याला समुपदेशकाने नेहेमीचा प्रश्न अनेकदा विचारला “तुम्हाला दारु सोडायची आहे की नाही?” वारंवार विचारलेल्या या प्रश्नावर नवरोबा ढिम्म उत्तर द्यायला तयार नव्हते. शेवटी पुन्हा पुन्हा विचारल्यावर त्या महाभागाने उत्तर दिले “थोडी कमी करायची आहे”.
चिंताग्रस्त चेहर्याची बायको बाजूला बसली आहे. तिला आणि कुटूंबियांनादेखिल त्या माणसाने व्यसनामुळे अतोनात दु:ख दिले असेल. सर्वांच्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला असेल. पण तरीही त्याला व्यसन पूर्णपणे सोडावे असे वाटत नव्हते. व्यसनाचा चिवटपणा कसा असतो याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर