नमस्कार,
बहुतेकवेळा व्यसनी व्यक्तीचा फुशारक्या मारण्याचा स्वभाव असतो हे आपण पाहात होतो. त्याचं एक उदाहरण मुक्तांगणमध्ये ऐकलं आहे. एकजण मुक्तांगणमध्ये दिवाळीच्या दरम्यान उपचारासाठी दाखल झाला होता. आणि दाखल झाल्यापासून तो सर्व लोकांना हेच सांगत होता की दिवाळीत मुक्तांगणमध्ये दाखल झाल्यामुळे आपले हजारो रुपयांचे नुकसान झाले. त्याचे म्हणणे असे की त्याचा फटाके विकण्याचा धंदा होता. आणि ऐन सिझनमध्ये घरच्यांनी त्याला मुक्तांगणमध्ये दाखल करून त्याच्या धंद्याची खोटी केली होती.
त्याच्या तोंडुन अनेकदा ही गोष्ट ऐकल्यावर खात्री करुन घेण्यासाठी म्हणून मुक्तांगणच्या कर्मचार्यांनी त्याच्या घरी फोन केला. घरच्यांनी त्याचा असा काही धंदा असल्याचे साफ नाकारले. तेव्हा लक्षात आले की साहेब खोटे बोलत होते. घरची मंडळी पुढे म्हणाली की असला काही धंदा असता तर त्याला त्याच फटाक्याच्या राशीवर बसवून पेटवला असता.
अशा तर्हेची फुशारक्या मारणारी अनेक मंडळी आपल्याला व्यसनी माणसांमध्ये आढळतात. स्वभावदोष हे व्यसनाचे मूळ असते हे आता असंख्य शेयरींग्ज ऐकल्यावर माझे मत झाले आहे. अशा स्वभावदोषांवर कसे काम करावे याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर