नमस्कार,
आपल्याकडे पराक्रमाचे मापदंड काय असतील सांगता येत नाही. व्यसनामध्ये कितीही प्यायला तरी हलत नाही हा एक मापदंड असतो. कितीही पिऊन गाडी चालवु शकतो हाही एक असेल कदाचित. कितीही प्यायलो तरी घरच्यांना कळत नाही असाही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण अशा माणसाच्या अहंकाराला खतपाणी घालणारे नेहेमी आसपास असतात हे मात्र खरे. अशी माणसे तुमचे मित्र असली तर तुम्हाला शत्रूंची वेगळ्याने गरजच भासत नाही.
आपल्याकडे समाजात चमत्कारिक प्रकार फार आहेत. जे पित नाहीत त्यांची “सभ्य” म्हणून थट्टा करणारी माणसे आहेत. बेवडा म्हणून व्यसनी माणसांना हिणवणारी माणसे खूप दिसतील. त्यांना पैसे पुरवुन त्यांना दारु पाजून नशेतील त्यांच्या चाळ्यांचा आनंद लूटणारी विकृत माणसेही आपल्या समाजात कमी नाहीत. पुढे त्यातला कुणी व्यसन सोडून चांगल्या मार्गाला लागला तर त्याला त्या मार्गावरून खाली खेचण्याचा प्रयत्न करणारेही महाभाग आहेत.
अशा वेळी सावध राहावे लागते. विशेषतः व्यसनमुक्तीच्या मार्गावर वाटचाल करणार्यांना तर अशा तथाकथित मित्रांपासून दूरच राहावे लागते. अशा मित्रांपासून दूर कसे राहावे याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर